पैसे देऊन ते पक्षात प्रवेश घडवत आहेत, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा तनपुरेंवर हल्लाबोल

 पैसे देऊन ते पक्षात प्रवेश घडवत आहेत, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा तनपुरेंवर हल्लाबोल

महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा राहुरी तालुक्यात प्रचार दौरा, सत्यजित कदम यांनी वाचला तनपुरेंच्या अपयशाचा पाढा

राहुरी: राहुरी तालुक्यामध्ये आदिवासी समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे.  महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्राजक्त तनपुरे यांच्याकडे आदिवासी खात्याचाही पदभार होता. तरी देखील आदिवासी समाज बांधवांचे  प्रश्न ते मार्गी लावू शकले नाहीत.  आता त्यांच्या पायाखालची वाळू घसरली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी पैसे दिले जात आहेत . जो पदाधिकारी कार्यकर्त्यांना घेऊन येईल त्यांना टक्केवारी दिली जाईल असे फर्मान त्यांनी काढले आहे. परंतु मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने ठरवले आहे की यंदा तनपुरेंना घरी बसवायचे. गावागावात मिळणारा प्रतिसाद पाहता मला फक्त लीड मोजायचे आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

राहुरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा, राहुरी खुर्द, देसवंडी, तमनर आखाडा, पिंप्री अवघड, कुक्कुडवेढे, उंबरे, ब्राह्मणी, चेडगाव, मोकळ ओहळ, कात्रड, गुंजाळे येथे मतदारांशी संवाद साधला. प्रत्येक गावात कर्डिले यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. महिला भगिनींनी औक्षण करून कर्डिले यांच्या पाठीशी राहण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.

यावेळी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, राहुरी सखर कारखान्याचे माजी चेअरमन उदयसिंह पाटील,   भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विक्रम तांबे, भाजप तालुकाध्यक्ष मीरा घाडगे , अण्णासाहेब बाचकर, अंबादास साखरे, सतीश शेटे, अर्जुन पानसंबळ  नितीन कलापुरे, नंदू शिंदे,  सागर कलापुरे, बाबासाहेब शिरसाट,  नंदूभाऊ डोळस, मिराताई घाडगे, गोरख चोपडे, आण्णासाहेब चौधरी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्डिले पुढे म्हणाले, भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे ऊर्जामंत्री असताना त्यांच्याकडून राहुरी मतदार संघामधील डी.पी. बसवण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला होता. त्यानंतर माझा पराभव झाला आणि त्या मंजूर कामाचे उद्घाटन विद्यमान लोकप्रतिनिधींनी केले. त्यांनी 2019 नंतर डीपी मंजूर केलेली दाखवा. गावागावात  विकासकामे करणाऱ्या माणसाचा पराभव झाला याची खंत आता राहुरी तालुक्यातील जनता बोलून दाखवीत आहे. त्यामुळे यंदा जनतेनेच परिवर्तन करण्याचे ठरविले आहे.

 राहुरी खुर्द गाव नेहमीच भाजपबरोबर राहिलले आहे : सत्यजित कदम

माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम म्हणाले की,  भाजप महायुती सरकारने  पहिल्यांदाच जनतेच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याचे काम केले आहे. जनतेने देखील विकास कामांवर मतदान केले पाहिजे. माझ्या आजोबाचे नाव जर कारखान्याला असते तर मी राहुरी सहकारी साखर कारखाना बंद पडून दिला नसता. आता राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस घालण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यासाठी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी कारखाना सुरू करण्यासाठी मदत करावी. आम्ही आता राहुरीकरच कारखाना चालू करू. तनपुरे यांचा खाजगी कारखाना वांबोरी येथे आहे. त्यांचे घर राहुरीत आहे आणि ते राहिला सासुरवाडीत असतात. ते कधीच जनतेला भेटत नाहीत आणि भाजपचे उमेदवार आमदार नसताना देखील जनतेच्या संपर्कात आहेत. दररोजच्या जनता दरबारात ते सर्वसामान्यांचे प्रश्न ते मार्गी असतात.

मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा हाच लाखमोलाचा आशीर्वाद: शिवाजीराव कर्डिले

राहुरी तालुक्यामध्ये आशीर्वाद घेण्यासाठी गाव भेट दौरा सुरू केला तेव्हा युवक महिला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने बाहेर येऊन माझे जल्लोषात स्वागत करत आहेत. मी केलेल्या कामांच्या माध्यमातून नागरिकांचा विश्वास संपादन केला असल्यामुळेच ऋणानुबंध निर्माण झालेत.  थेट जनतेच्या संपर्कात राहून सुखदुःखामध्ये सामील होत नागरिकांचे प्रश्न समजावून घेत सोडविले जात आहेत. त्यामुळे गावोगावी मोठ्या उत्साहात जल्लोषात स्वागत केले जात आहे . हे उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पाठिंबाच मला लाखमोलाचा आहे, अशी भावना शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments