दिवाळी सणामध्ये मातीचे किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन

 राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचेवतीने

दिवाळी सणामध्ये मातीचे किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन

नगर - राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाच्या अहिल्यानगर शहर शाखेच्या वतीने शहरातील लहान मुला-मुलींसाठी दिवाळी सणामध्ये मातीचे किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे शहराध्यक्ष महेश गुगळे यांनी दिली.

ते म्हणाले, ऐतिहासिक शहर अशी ओळख असलेल्या या शहरात दिवाळीचा सण परंपरेप्रमाणे मोठ्या उत्साहात अत्यंत श्रध्देने साजरा केला जातो. सहामाही परिक्षा झाल्याने दिवाळीची सुट्टी लागल्यापासून लहान मुले-मुली आपल्या घरासमोरील अंगणात आपापल्या कल्पनाशक्तीनुसार माती, पोती, दगड, विटा, कामट्या वापरून किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवतात. गेरू, चुना यांचा वापर करत किल्ला रंगवतात. हिरवळीसाठी हाळीव पेरतात. मूर्ती मांडत, पणत्या पेटवताना त्या प्रकाशात छत्रपती शिवाजी महाराजांनी बालवयातच हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांनी दिलेल्या लढ्यांच्या कथा ऐकमेकांना सांगत छत्रपतींनी उभारलेल्या या हिंदवी स्वराज्य रक्षणाची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे, हे लक्षात घेऊन वज्रमूठ बांधतात. किल्ले उभारण्यामधून बालमनांवर राष्ट्रासाठी उभे रहाण्याचा सुसंस्कार होतो. हा संस्कार म्हणजेच राष्ट्रकार्य होय. या राष्ट्र कार्याच्या सद् भावनेनेच किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

घरासमोरील अंगणात मातीचा वापर करून आकर्षक सजावट केलेल्या किल्ल्यांमधून प्रथम तीन क्रमांक आणि तीन उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात येतील. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश मोफत असून सर्व सहभागी मुला-मुलींना आकर्षक सन्मानपत्र समारंभपूर्वक देवून गौरविण्यात येईल. याच समारंभात घरातील गणपती आणि महालक्ष्मी सजावट स्पर्धांचेही बक्षिस वितरण केले जाईल. नाव नोंदणी केलेल्या स्पर्धकांना तसे कळवण्यात येईल.

किल्ले बनवा स्पर्धेसाठी स्पर्धकांनी स्वतः तयार केलेल्या किल्ल्याच्या सजावटीचा फोटो व व्हिडिओ ९७६२४५९४४४/८३९००९५८५९ किंवा ९४२२४९५२८९  या भ्रमणध्वनीवर पाठवताना आपले नाव आणि पत्ता कळवावा. किल्ला एकट्याने तयार केला की  अनेकांनी मिळून बनवला तेही कळवावे. नगर शहरातील आणि उपनगरामधील अधिकाधिक मुला-मुलींनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे शहराध्यक्ष महेश गुगळे व उपाध्यक्ष वरद मुठाळ यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments