शहराच्या जागेवरून राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी...

 शहराच्या जागेवरून राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी... 

जागा न सोडल्यास काँग्रेस बैठकीत कार्यकर्त्यांचा बंडाचा सूर, वेगळा मार्ग निवडण्याचा , काँग्रेसचा इशारा

नगर  : लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांना खासदार करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. त्या विजयाचे खरे किंगमेकर हे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आहेत. हे राष्ट्रवादीने विसरू नये. मागील पाच वर्षांपासून शहरामध्ये किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरात गुंडगिरी, तांबेमारी आणि विकासाच्या मुद्द्यावरती काँग्रेसनेच लढाई उभी केली आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेला श्रीगोंद्याची जागा दिली. आघाडीचा धर्म राष्ट्रवादीने पाळावा. शहराची जागा काँग्रेसला सोडावी. अन्यथा किरण काळे यांनी बंडखोरी करत उमेदवारी करावी, असा आग्रह काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी धरला आहे. जागा काँग्रेसला न सोडल्यास वेगळा विचार करण्याचा इशारा काँग्रेसने राष्ट्रवादीला दिला आहे. 

नगर शहराच्या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शहराची जागा काँग्रेसलाच मिळावी याकरिता काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीवर चांगलेच शरसंधान साधले. लोकसभेला आम्ही तुमचे काम केले. दक्षिणेत सहा जागा राष्ट्रवादी लढते. श्रीगोंदा ची एक जागा राष्ट्रवादीने शिवसेनेला दिली. मात्र काँग्रेसवर अन्याय का ? किरण काळे यांनी शहराच्या विद्यमान नेतृत्वाच्या विरोधात लढाई उभी केली. काँग्रेसकडे सक्षम नेतृत्व आहे. पक्ष संघटना देखील अत्यंत मजबूत आहे. बूथ लेवल पर्यंत निवडणुकीची तयारी पक्षाने केली आहे. तरी देखील राष्ट्रवादी ही जागा सोडत नाही. आघाडी धर्म काँग्रेसने एकट्यानेच का पाळायचा ? असा सवाल बैठकीत कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. 

खा. लंके यांनी काँग्रेस मदतीची परतफेड करावी : 

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक हाती घेतली नसती तर निलेश लंके खासदार होऊ शकले नसते. हे स्वतः लंके यांनी जाहीररित्या अनेक वेळा सांगितले आहे. नुसतेच कौतुक करून कसे चालेल ?आता मदतीची परतफेड करण्याची वेळ आली आहे. खासदार लंके यांनी त्यांच्या वरिष्ठांना स्पष्टपणे सांगितले पाहिजे. प्रत्यक्ष कृतीतून मदतीची परतफेड केली पाहिजे. ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते फक्त सतरंज्या उचलण्या करिता आहेत काय ? खासदारांनी ही जागा त्यांच्या वरिष्ठांना काँग्रेसचा सोडायला सांगावी. अन्यथा काँग्रेसला कोणीही गृहीत धरू नये. आम्हाला सर्व मार्ग मोकळे राहतील. 

कर्जत जामखेड कार्यकर्त्यांची देखील राष्ट्रवादीवर नाराज : 

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आ. रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघात देखील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नुकतीच बैठक घेत पवार यांच्यावरती शरसंधान साधले होते. जिल्ह्यात राष्ट्रवादी ही काँग्रेसला दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. काँग्रेस नामशेष करण्याचा राष्ट्रवादीचा अजेंडा आहे काय ? असा सवाल दक्षिणेतील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. 

शहराच्या जागेवरून रणकंदन: 

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विद्यमान आमदारां विरोधात भारतीय जनता पार्टीने विरोधी सूर लावला आहे. यामुळे महायुतीत अलबेल नसताना महाविकास आघाडीत देखील आता काँग्रेसने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विरोधात उघडपणे टीका केली आहे. यामुळे शहराच्या जागेवरून राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असे रणकंदन उभे झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Post a Comment

0 Comments