अंधांची दिवाळी आनंदी करण्यासाठी 'दिव्यदृष्टी' च्या धडपड्या दिव्यांगाना हवे दानशुरांचे बळ

 अंधांची दिवाळी आनंदी करण्यासाठी 'दिव्यदृष्टी' च्या धडपड्या दिव्यांगाना हवे दानशुरांचे बळ



अहिल्यानगर :  समाजातील गरीब ,गरजू दिव्यांग यांची दिवाळी आनंदी व्हावी म्हणून मागील 5 वर्षांपासून नगर जिल्ह्यातील जाणिवा जागृत असणारे दिव्यांग धडपडत आहेत. आपण ज्या परिस्थितीतून प्रगत झालो, त्या परिस्थितीची आठवण ठेवून दिव्यदृष्टीचे नोकरी करणारे अंध जन सातत्याने नवोपक्रम राबवत आहेत. यंदाच्या दिवाळीत नगर जिल्ह्यातील अतिशय पीडित अशा अंध प्रवर्गातील दिव्यांग यांना दिवाळी फराळ करण्यासाठी किराणा किट वाटप करण्याचा दिव्यदृष्टीच्या दिव्यांग यांनी ठरविले आहे. उपक्रमाचे हे 5 वे वर्ष आहे. येत्या  27 ऑक्टोंबर 2024 रोजी  नगर येथे नोंदणीकृत अंधांना किट दिले जाणार आहे. या किट वाटप कार्यक्रम मध्ये 100 दिव्यांग यांना किराणा किट वाटप करण्यासाठी दानशुरांच्या मदतीची आवश्यकता आहे. तरी दात्यांनी दिव्य दृष्टी च्या अंध जन यांना आर्थिक अथवा वस्तुरुप किराणा स्वरुपात मदत करावी असे आवाहन स्वतः अंध असून ही केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागात उच्चाधिकारी असणारे  कृष्णा तवले,निलेश शिंदे, सुभाष शिंदे, किरण खेतमालीस, ढवण उम्रेडकर यांनी केले आहे. 

*दिव्यदृष्टी अंधांचे कृतिशील पाऊल*

नगर, पुणे,मुंबई, सोलापूर येथे सरकारी नोकरी करणारे मूळचे नगर जिल्ह्यातील अंध जन यांनी एकत्र येऊन 5 वर्षांपूर्वी दिव्यदृष्टी या सामाजिक संस्थेची स्थापना केली. स्वतः अंध असतानाही शालेय, महाविद्यालयीन जीवनात समाज, विविध सामाजिक संस्था, दानशूर मंडळी यांनी मदत केल्याने जीवन घडले. अनेक चढ उतार पाहत , ठेचकाळत ज्यांचे जीवन नोकरी आणि आत्मविश्वासाने स्वावलंबी झाले. अशांच्या जाणिवा प्रगल्भ झाल्या. आपल्या सारखेच अडचणीत असणारे, नोकरी न मिळू शकलेले असंख्य दिव्यांग प्राप्त परिस्थितीतीशी झगडत आहेत. त्या भावा बहिणी यांना सहज मदत व्हावी म्हणून दिव्यदृष्टी संस्था प्रयत्न करीत आहे. यंदाच्या दिवाळीत अशा अंध जन यांना मदत व्हावी म्हणून किराणा किट वाटप केले जाणार आहे.


*अशी मदत देऊ शकता*

नगर जिल्ह्यातील ज्या देणगीदार यांना अशा गरजू अंधांना मदत करायची आहे. त्यांनी दिव्यदृष्टी च्या कार्यालयात पुढील किराण्याची वस्तूरूप मदत देऊ शकता. या किट मध्ये पुढील प्रमाणे वस्तू असणार आहेत.साखर,गूळ,रवा,खाद्यतेल,

बेसन पीठ,शेंगदाने, मैदा,खोबरा, वनस्पती तूप,पोहे, चुरमुरे, डाळे, मोती साबण आदी विविध जिनसा किराणा मालात असणार आहेत.

एका किट ची किमंत १२००/- रुपये असून आपण आपल्या यथाशक्ती संस्थेस आर्थिक स्वरुपात मदत देऊ शकता. क्यू आर कोड अथवा थेट धनादेश अथवा ऑनलाईन आपण आर्थिक मदत संस्थेस देऊ शकता.आपण संस्थेस दिलेल्या देणग्या यांना आयकर कलम ८० जी नुसार आयकरात सवलत मिळणार आहे.

या पूर्णतः अथवा अल्पदृष्टी अंध यांना अधिकाधिक मदत केल्याने थेट गरजू दिव्यांग यांना मदत पोहचली जाणार असल्याने किराणा किट मदतीचे आवाहन केल्यावर १० किट ची मदत संस्थेस मिळाली आहे. जास्तीत जास्त दानशूर नगरकर यांनी दिव्यदृष्टी  संस्थेस मदत करावी. अधिक माहिती साठी 9850885946/ 9420161923 यावर संपर्क करावा.

Post a Comment

0 Comments