नगरला आज अहिल्यादेवी महोत्सव

 नगरला आज अहिल्यादेवी महोत्सव

सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी

अहिल्यानगर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त नगर शहरात आज रविवारी (20 ऑक्टोबर) सांस्कृतिक महोत्सव होणार आहे. आज सायंकाळी साडेपाच वाजता जिल्हा सहकारी बँकेच्या यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात हा महोत्सव होणार आहे. जय मल्हार या प्रसिद्ध टीव्ही मालिकेत खंडेरायाची भूमिका करणारे प्रसिद्ध अभिनेते देवदत्त नागे तसेच प्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले, प्रसिद्ध कलावंत भरत जाधव यांचा पुतण्या हार्दिक जाधव, स्वप्निल राजशेखर आदींसह तब्बल 30 कलावंतांचा संच हा सांस्कृतिक महोत्सव सादर करणार आहेत. सर्वांसाठी हा महोत्सव विनामूल्य खुला आहे.

राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या पुढाकाराने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्तचा सांस्कृतिक कार्यक्रम नगरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर पोवाडा, नाट्य, संगीत, नृत्य, माहितीपट अशा प्रयोगात्मक कलेतून सादरीकरण केले जाणार आहे. या महोत्सवाच्या समन्वयक नूतन जयंत आहेत. अभिनेते देवदत्त नागे, अभिनेत्री भार्गवी चिरमुले, नाट्य कलावंत सुचित जाधव, कोल्हापूरचे अभिनेते स्वप्निल राजशेखर, अभिनेत्री नूतन जयंत, अभिनेता हार्दिक जाधव आदींसह 30च्यावर कलावंतांचा या महोत्सवात कलाविष्कार अनुभवता येणार आहे. राजू बारसे यांनी या महोत्सवाचे दिग्दर्शन केले आहे.


सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चावरे व सहसंचालक श्रीराम पांडे यांच्या पुढाकाराने होत असलेल्या या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्तच्या सांस्कृतिक महोत्सवास सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे आदी उपस्थित राहणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जीवन चरित्रावरील माहितीपट, पोवाडा तसेच संगीत-नाट्य-नृत्यांचे प्रयोगात्मक कला सादरीकरण या महोत्सवातून होत असून सर्वांसाठी विनामूल्य खुल्या असलेल्या या महोत्सवास नगरकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments