जळगाव : तीनशे रुपयांचा मोह अन् तलाठी जाळ्यात

जळगाव : तीनशे रुपयांचा मोह अन् तलाठी जाळ्यात

मंगळवारी दुपारी तलाठ्याला तीनशे रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.

वेब टीम जळगाव  : तीनशे रुपयांचा मोह आवरला न गेल्याने भुसावळ तालुक्यातील साकरी येथील लाचखोर तलाठी जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या जाळ्यात अडकला. मंगळवारी दुपारी तलाठ्याला तीनशे रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.

भुसावळ येथील तक्रारदाराने खडका हद्दीमध्ये भूखंड खरेदी केला आहे. त्यामुळे तक्रारदार हे भूखंडाचे खरेदीखत घेऊन सात-बारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी विहित अर्जासह खडका-साकरी (ता. भुसावळ) येथील तलाठी कार्यालयात गेले. तेथे तलाठी मनीषा गायकवाड (रा. मोरेश्वरनगर, साकेगाव शिवार, भुसावळ) यांनी नवीन खरेदी केलेल्या भूखंडाच्या सात-बारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठीचा अर्ज दाखल करून घेणे आणि सात-बारा उताऱ्यावर नाव लावण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे पंचासमक्ष तीनशे रुपये मागितले. लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वतः स्वीकारताना तलाठी मनीषा गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

पथकाने तलाठी गायकवाड यांना अटक करून जळगाव येथे आणल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांनी दिली. लाचखोर तलाठी गायकवाड यांच्याविरुद्ध भुसावळ येथील तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी विभागातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे कोणत्याही शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्तीने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments