राज ठाकरेंना ‘उंदीर’ म्हणणारे बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार

 राज ठाकरेंना ‘उंदीर’ म्हणणारे बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार, म्हणाले “महाराष्ट्रातील कोणत्याही पैलवानाने…”



राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे बृजभूषण सिंह १५ डिसेंबरला महाराष्ट्रात

वेब टीम लखनौ : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरील टीकेमुळे चर्चेत आलेले उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार बृजभूषण सिंह महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. १५ डिसेंबरला बृजभूषण सिंह राज्यात येणार असून मनसेकडून त्यांना कोणताही विरोध होणार नसल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान यावर बृजभूषण सिंह यांनी ‘एबीपी माझा’शी संवाद साधला आहे. राज ठाकरे विरोध करत नाहीत ही चांगली गोष्ट आहे असं बृजभूषण सिंह म्हणाले आहेत. राज ठाकरेंना माझा तात्विक विरोध असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

“राज ठाकरेंना माझा तात्विक विरोध होता. मी राज ठाकरेंसमोर एक अट ठेवली होती की, संतांची, जनतेची, पंतप्रधानांची माफी मागा. आपल्याकडून चूक झाल्याचं मान्य कऱण्यास मी सांगितलं होतं. माझ्या दौऱ्याला ते विरोध करणार नसतील तर चांगली गोष्ट आहे. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे,” असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे. 

“आम्ही तर कुस्तीमधील आहोत. संपूर्ण देशभर आम्ही प्रवास करत असतो. महाराष्ट्रातील कोणत्याही पैलवानाने आपण भेदभाव करत असल्याचं सांगावं. आम्ही त्यांना प्रेम देतो, सन्मान करतो. त्यांची प्रत्येक गरज पूर्ण करतो,” असंही ते म्हणाले.

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला केला होता विरोध

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. यानंतर बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय त्यांना उत्तर प्रदेशात पाय देखील ठेऊ देणार नसल्याचा इशारा दिला होता.

“उत्तर भारतीयांना विरोध करणारे कधीच येथे घुसू शकत नाही. मला मंत्री, नेता व्हायचं नाही आहे. मला द्यायचं तेवढं देवाने, पक्षाने आणि जनतेने दिलं आहे. जर उत्तर भारतीयांवर पुन्हा हात उचलला तर आम्ही शांत बसणार नाही, महाराष्ट्रात पोहोचू. ते दिवस आता संपले आहेत जेव्हा उत्तर भारतीयांना मारहाण केल्यानंतर काँग्रेस पक्ष त्यांना संरक्षण देत होतं. आता त्यांना सुरक्षा मिळणार नाही. कोणतीही व्यक्ती धर्मविरोधी, देश तोडणारं वक्तव्य करत असेल तर पोलिसांनी त्यांची सुरक्षा हटवली पाहिजे,” असं बृजभूषण शरण सिंह म्हणाले होते.

“राज ठाकरे दबंग नाही तर उंदीर आहेत. पहिल्यांदा बाहेर येत आहेत. माझं म्हणणं ऐकलं नाही, माफी मागितली नाही तर मी वचन देतो की उत्तर प्रदेश, बिहार आणि छत्तीसगड सक्षम आहेत. ते आयुष्यात कधीच येऊ शकणार नाहीत. मला मराठ्यांचं समर्थन आहे असा दावाही यावेळी त्यांनी केला होता.

Post a Comment

0 Comments