राज्यपालांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे भावना भडकवत आहेत का?

राज्यपालांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे भावना भडकवत आहेत का? 


उदयनराजे राज्यपालांविरोधात आक्रमक, पंतप्रधान कार्यालयाकडे सोपवलं पत्र

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यपालांचं विधान तसंच सीमावादाचा मुद्दा आणि राज्याबाहेर गेलेले प्रकल्प यासह विविध मुद्यांवरून महाविकास आघाडी १७ डिसेंबरला मुंबईत भव्य मोर्चा काढणार आहे. अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी गुरुवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र तोडण्याचे काम सुरू आहे अशी टीका केली. दरम्यान यावर भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत भाजपाच्या खासदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीला भाजपाचे मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधील राज्यसभेचे खासदार उपस्थित होते. या बैठकीनंतर उदयनराजे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्यपालांविरोधात पंतप्रधान कार्यालयात पत्र देण्यात आलं असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

“एखादा विषय वाढू नये, जेणेकरुन संबंधित राज्यात तेढ निर्माण होऊ नये अशी भावना आहे. छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाची अस्मिता आहेत. त्यांच्याबद्दल प्रत्येकाने मोजून मापून बोललं पाहिजे. राज्यपाल हे पद मोठं असून त्यांच्या विधानानंतर असंतोष व्यक्त होत आहे. यावर लवकरात लवकर तोडगा काढणं गरजेचं आहे. आधीप्रमाणे राज्यातील स्थिती व्हावी यासाठी आम्ही मोदींकडे मागणी केली आहे,” अशी माहिती उदयनराजेंनी दिली

“२६ खासदार असल्याने पंतप्रधानांना पुरेसा वेळ देता आला नाही. पण त्यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून राज्यपालांविरोधातील पत्र देण्यात आलं आहे,” अशी माहिती उदयनराजेंनी दिली. केंद्र सरकार दखल घेत नसल्याचा आरोप यावेळी त्यांनी फेटाळला.

महाविकास आघाडीचा १७ डिसेंबरला मोर्चा

महाविकास आघाडी १७ डिसेंबरला मोर्चा काढत असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले “हा कोणत्याही आघाडीचा किंवा पक्षाचा प्रश्न नाही. याकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहण्याची गरज नाही. पण शिवप्रेमी नाराज आहेत हे नक्की आहे. जे घडत आहे त्याकडे दुर्लक्ष केलं तर फरक पडत नाही असं चित्र निर्माण होऊ नये. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हे सतत घडत राहिलं तर चांगलं नाही”. राज्यपाल हे पद काही छोटं नाही. पण लवकरात लवकर निर्णय व्हावा अशी सर्वांचीच अपेक्षा आहे असं उदयनराजेंनी सांगितलं.

उद्धव ठाकरे राज्यपालांच्या विधानावर राजकारण करुन भावना भडकवत आहेत का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “राजकारण होत आहे असं म्हणता येणार नाही. जे सत्तेत असतात तेच राज्यपालांची नेमणूक करतात. पण भाजपाने त्यांना असं बोला म्हणून सांगितलेलं नाही. त्या वक्तव्यासाठी पक्षाला जबाबदार धरलं जाऊ शकत नाही. पण चूक झाली असेल तर कारवाई झाली पाहिजे”. राज्यापालांनी माफी न मागितल्याची खंत वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Post a Comment

0 Comments