ह्रदयद्रावक! दोन दिवसावर साखरपुडा' अन् भावाच्या डोळ्यादेखत बहिणीला ट्रकने चिरडले
वेब टीम भंडारा : दोन दिवसावर आलेल्या साखरपुड्यासाठी बॅग खरेदी करण्याकरिता भावासोबत दुचाकीवर गेलेल्या सीआरपीएफ जवान बहिणीचा अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपुलावर घडली. किरण सुखदेव आगाशे (२५) असे मृत तरुणीचे नाव आहे, तर लोकेश सुखदेव आगाशे (२१) रा. निलज खुर्द, ता. मोहाडी, असे जखमीचे नाव आहे. किरण मुंबई सीआरपीएफ कॅम्पमध्ये सेवेत होती. ती लोकेशसोबत तुमसर येथे बॅग खरेदीसाठी आली होती.
खरेदी करून दुचाकीने ते निलजकडे जात होते. देव्हाडी उड्डाणपुलावरून जाताना समोरून आलेल्या दुचाकीने कट मारल्याने दोघेही भाऊ-बहिण रस्त्यावर पडले. दरम्यान, मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकखाली किरणचे डोके चिरडले गेले आणि तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर भाऊ लोकेश गंभीर जखमी झाला. घटनास्थळावर रक्ताचा सडा पडला होता. किरणचाचा विवाह ठरल्याने ती आठ दिवसांपूर्वी गावी आली होती. दोन दिवसांनंतर तिचे साक्षगंध होते. अपघाताची माहिती मिळताच आई व वडिलांनी हंबरडा फोडला.
0 Comments