“रघुराम राजन स्वत:ला…”; RBI च्या माजी गव्हर्नरांवर BJP ची टीका!

  “रघुराम राजन स्वत:ला…”; RBI च्या माजी गव्हर्नरांवर BJP ची टीका!

म्हणाले, “भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल त्यांनी…”

र भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले राजन (फोटो सौजन्य- सोशल मीडियावरुन साभार)(BJP-on-Raghuram-Rajan-in-Bharat-Jodo-Yatra)

वेब टीम सवाई माधोपूर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मंगळवारी राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये सहभाग घेतला. राजस्थानमध्ये राहुल गांधींच्या यात्रेत सहभागी झालेल्या राजन यांच्यावर आता भारतीय जनता पार्टीने टीका केली आहे. राजस्थानमधील सवाई माधवपूर येथील भदोईमधून राहुल गांधींबरोबर राजन चालत असल्याचे फोटो काँग्रेसने ट्वीट केल्यानंतर आता भाजपाने यावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

“भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधींबरोबर चालताना आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन”, अशा कॅप्शनसहीत राहुल गांधी आणि रघुराम राजन यांचा फोटो काँग्रेसच्या ट्वीटर हॅण्डलवरुन मंगळवारी शेअर करण्यात आला. “नफरत के खिलाफ देश जोड़ने के लिए खड़े होने वालों की बढ़ती संख्या बताती है कि- हम होंगे कामयाब,” असंही हा फोटो शेअर करताना म्हटलं.

रघुराम राजन यांनी भारत जोडो यात्रेला लावलेल्या हजेरीवरुन भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालविया यांनी ट्विटरवरुन टीकास्त्र सोडलं आहे. रघुराम राजन यांचा उल्लेख ‘काँग्रेसने नियुक्त केलेले’ असं करत मालविया यांनी टीका केली आहे.

“रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना काँग्रेसने नियुक्त केलं आहे. त्यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभाग नोंदवला याचं काही आश्चर्य वाटलं नाही. ते स्वत:ला पुढील मनमोहन सिंग म्हणून पाहतात. भारताच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात त्यांनी केलेलं भाष्य हे दुसऱ्याकडे तिरस्काराने बघण्याची पद्धत असं म्हणत झिडकारलं पाहिजे,” असं म्हटलं पाहिजे. त्यांच्या टीकेला एक विशिष्ट (विचारसणीचा) रंग आहे आणि ही टीका म्हणजे संधीसाधूपणा आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

रघुराम राजन यांनी यापूर्वी अनेकदा केंद्रातील मोदी सरकारच्या आर्थिक आणि सामाजिक धोरणांवर टीका केलेली आहे. भारताचा विकास हा मुक्त लोकशाहीला अधिक पाठबळ देण्यामध्ये आणि आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेल्या संस्थांना सामर्थ्यवान बनवण्यामध्ये आहे, असं राजन सांगतात. राजन हे मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयावर उघडपणे टीका करणाऱ्या प्रमुख तज्ज्ञांपैकी एक आहेत. “आर्थिक विकास मंदावण्यासाठी हा राजकीय आणि सामाजिक अजेंडा” कारणीभूत ठरला असं राजन यांनी यापूर्वी म्हटलं आहे. यावरुन भारतीय जनता पार्टीने कठोर शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवलेली.

Post a Comment

0 Comments