‘राज्यपाल हटाव’ च्या मुद्द्यावर संभाजीराजे-उदयनराजे आक्रमक

‘राज्यपाल हटाव’ च्या मुद्द्यावर संभाजीराजे-उदयनराजे आक्रमक

“कोश्यारी खासगीत म्हणतात…मला माझ्या राज्यात परत जायचे आहे ”

वेब टीम मुंबई : राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात पुण्यात खासदार उदयनराजे भोसलेंसह काही शिवप्रेमी संघटनांची बैठक होत आहे. याशिवाय संभाजीराजेंनीही राज्यपाल हटावची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता महाविकासआघाडी म्हणून या विषयावर भूमिका घेणार का? असा प्रश्न राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी खासगीत काय म्हणतात हे सांगत आपली भूमिका मांडली. ते सोमवारी (२८ नोव्हेंबर) पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “खरंतर राज्यपालांच्या वक्तव्यावर आम्ही तातडीने प्रतिक्रिया दिल्या. मी तर २४ तासाच्या आत ट्वीटही केलं होतं, नंतर मला माझी भूमिका स्पष्ट करायची होती तीही सांगितली. परंतु, माझं पुन्हा पुन्हा सर्वांना सांगणं आहे की, बेरोजगारी आणि महागाई हे प्रश्न आपण बाजूला ठेवतो आणि असे गरज नसलेले प्रश्न निर्माण करतो. हे थांबवलं पाहिजे.”

“आपल्याकडे महत्त्वाचे विषय खूप आहेत”

“आपल्याकडे महत्त्वाचे विषय खूप आहेत. शेतकऱ्यांचे पीकविमा, वेळेत परतफेड करतात त्यांच्या ५० हजारांच्या कर्जमाफीचा प्रश्न, रब्बीचं पीक वाया गेलंय असे अनेक प्रश्न आहेत,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.

राज्यपालांवर कारवाई व्हावी की न व्हावी? अजित पवार म्हणाले…

राज्यपालांवर कारवाई व्हावी की न व्हावी? असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, “ज्यावेळी मोठ्या पदावर बसणाऱ्या व्यक्ती अशाप्रकारची वक्तव्ये करतात त्यावेळी त्यांना त्या पदावर बसवणाऱ्या व्यक्तींनी संबंधितांना तसं सांगितलं पाहिजे. बरं हे एकदा घडलेलं नाही. एकदा घडलं तर समजू शकतो. कधीकधी आमच्याकडूनही बोलताना चूक होते. तेव्हा आम्ही दिलगिरी व्यक्त करून मोकळे होतो. तसं एकदा घडलं नाही, सातत्याने घडतंय.”

“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी खासगीत म्हणतात की…”

“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी खासगीत म्हणतात की, मला आता माझ्या राज्यात परत जायचं आहे. मग ते काही कारण आहे की काय हेही कळायला मार्ग नाही. या प्रकरणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं लंगडं समर्थ करण्याचा कोणी प्रयत्न करू नये. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कोणत्याही व्यक्तीने अशाप्रकारे वक्तव्य करण्याचं काहीच कारण नाही. महाराष्ट्र ते खपवूनही घेणार नाही,” असा इशारा अजित पवारांनी दिली.

“…तर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांचा वरिष्ठांनी विचार करावा”

“जाणीवपूर्वक सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, शिवाजी महाराज अशा महापुरुषांविषयी वक्तव्य येत असतील तर त्याचा वरिष्ठांनी विचार केला पाहिजे,” असाही मुद्दा अजित पवारांनी नमूद केला.

Post a Comment

0 Comments