२४ वर्षांनंतर काँग्रेस अध्यक्षपद गांधी कुटुंबाबाहेर

२४ वर्षांनंतर काँग्रेस अध्यक्षपद गांधी कुटुंबाबाहेर

विजयानंतर मल्लिकार्जुन खरगेंची पहिली प्रतिक्रिया

वेब टीम नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे यांचा विजय झाला आहे. या निवडणुकीत खरगेंना ७ हजार ८९७ मतं मिळाली. त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे काँग्रेस खासदार शशी थरूर यांना १ हजार ७२ मतं मिळाली. निकाल जाहीर झाल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषद घेत पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी शशी थरूर यांनाही मी शुभेच्छा देतो म्हटलं. तसेच निकालानंतर थरूर यांनी भेट घेत पक्षवाढीच्या कामावर चर्चा केल्याचं सांगितलं.

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर पक्षांतर्गत निवडणूक घेऊन देशाच्या लोकशाहीला मजबूत करण्याचं उदाहरण समोर ठेवलं आहे. पक्षांतर्गत निवडणूक यशस्वीपणे घेतली यासाठी मी काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेते, कार्यकर्ते आणि या कार्यक्रमाशी संबंधित सर्वांचे मी आभार मानतो. या सर्वांनी या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होत काँग्रेसला मजबूत केलं आहे.”

“शशी थरूर यांनाही मी शुभेच्छा देतो”

“माझे सहकारी शशी थरूर यांनाही मी शुभेच्छा देतो. कारण निवडणुकीत आम्ही प्रतिस्पर्धी होतो. निवडणूक खूप चांगल्या प्रकारे झाली. निवडणुकीनंतर तेही मला येऊन भेटले. यावेळी आम्ही पक्षाला पुढे घेऊन जाण्याबाबत चर्चा केली,” असं मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं.

“सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी सोनिया गांधींचे आभार मानतो. त्यांनी व्यक्तिगत त्याग करून २३ वर्षे काँग्रेस पक्षाला आपल्या रक्ताने आणि घामाने मोठं केलं. सोनिया गांधींच्या नेतृत्वात आम्ही केवळ केंद्रात दोनदा सरकार स्थापन केले नाही, तर अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची पुनर्बांधणी केली आणि अनेक राज्यांमध्ये सरकार स्थापन केलं. त्यांचा कार्यकाळ इतिहासात लक्षात राहील,” असंही खरगेंनी नमूद केलं.

Post a Comment

0 Comments