नगरकरांचे श्रद्धास्थान केडगावची रेणुकामाता

 ।। जागर शक्तीचा ।। जागर भक्तीचा 

 नगरकरांचे श्रद्धास्थान केडगावची रेणुकामाता 

नगरच्या रेल्वे स्टेशन पासून सुमारे एक मैल अंतरावर केडगाव येथे श्री रेणुकामातेचे जागृत देवस्थान आहे. शहरालगत असलेल्या या मंदिराचा इतिहास फार पुरातन आहे. पेशवेकालीन राजवाडे सरदारांनी देवीचे मंदिर उभारलं. भरगच्च निवडुंगाच्या  झाडांनी वेढलेले हे निबिड अरण्य होते.  वाघांचा जंगलात मुक्तपणे वावर असे.  आश्चर्याची बाब म्हणजे रात्री देवदर्शनास वाघांची स्वारी तर डरकाळ्या फोडत येई त्यामुळे सायंकाळच्या आरतीनंतर सर्वजण घरी परतत.   

या मंदिराबाबत आख्यायिका सांगितली जाते की पूर्वी गुरव कुटुंबात श्री रेणुका मातेच्या कृपाप्रसादाने पुत्र रत्न जन्माला आले. बाळाचे नाव आवडीने भवानी असे ठेवण्यात आले. त्या भवानी यांनी  रेणुका मातेची अखंड मनोभावे सेवा केली श्री क्षेत्र माहूर हे त्यांचे मुख्य श्रद्धास्थान,साडेतीन शक्ती पिठातील हे एक पूर्ण पीठ  होय माहूरगड निवासिनी रेणुका मातेच्या नामस्मरणात भवानी गुरव तल्लीन असायचे त्यांच्या या निस्सीम भक्तीवर देवी प्रसन्न झाली मी आता तुझ्यासोबत येते असे देवीने सांगताच आनंदाने भवानी गुरव परतीच्या प्रवासाला लागले.केडगाव परिसरात येत असताना त्यांनी मागे वळून पाहिले देवी चे दर्शन झाले मात्र देवी जागेवरच अंतर्धान पावली हल्ली त्याच जागेवर स्वयंभू रेणुका देवीची मूर्ती आहे ही मूर्ती अगदी हुबेहूब माहुरगड प्रमाणेच आहे. देवीच्या समोर जेथून  भवानी गुरवाने मागे वळून पाहिले  तेथे  पादुका  आहेत.

रेणुका देवीच्या मूर्ती शेजारी तुळजाभवानीची ही मूर्ती आहे मंदिरात उजवीकडे श्री महादेवाचे मंदिर असून शिवभक्तांना  दर्शनाचा लाभ मिळतो, छोटे विठ्ठल रुक्मिणी मंदिर व भैरवनाथ मंदिरही या परिसरात आहे.

याच मंदिरात देवदैठण येथील संत शिरोमणी श्री निंबराज महाराज काशीयात्रे हून गंगेची कावड घेऊन परतत असताना देवीने गवळणीच्या स्वरूपात त्यांना दर्शन दिले.  मंदिराच्या जवळपास वस्ती नसलेल्या त्या ठिकाणी निंबराज महाराज आले असता भुकेने व्याकूळ झालेले होते.  त्यांनी सरळ देविस विनवणी  केली तर साक्षात देवी गवळण होऊन डोक्यावर दुधाचा माठ घेऊन आली, निंबराज महाराजांनी दूध पिल्यानंतर सर्वत्र शोधाशोध केली परंतु कोणीच दिसले नाही.  त्यांनी आंतरज्ञानाने जाणले होते कि  गवळण म्हणजेच साक्षात  माता होती. नंतर देवीभक्त झाले त्यांनी आपल्याबरोबर काशीयात्रेहून आणलेली गंगेची कावड मंदिराशेजारील बारावामध्ये ओतली आज कितीही उन्हाळा असला तरी त्या  बारावा मध्ये पाणी असते.

1945 मध्ये कै. बाबासाहेब मिरीकर यांनी मंदिरापर्यंत रस्ता बनवला मंदिराभोवती उंच तट असून मुख्य मंदिरासमोर प्रशस्त प्रांगण आहे. मंदिराशेजारी भाविकांसाठी सुंदर बगीचा तयार व्हावा अशी श्री गुरव कुटुंबीयांनी भावना व्यक्त केली.नवरात्रात येथे घटी म्हणून स्त्रिया राहतात मंदिराबाहेर पुरातन दीपमाळ आहे.परिसरात आराधी लोकांना राहण्यासाठी परसळी (ओवर्या) आहेत.  मंदिराची पूजाअर्चा चार गुरव  यांच्या घरात विभागली आहे.  शहरालगत असलेले हे मंदिर नवरात्रोत्सवासाठी सुशोभित करण्यात येते.  येथे जाण्या येण्यासाठी एसटी महामंडळाकडून जादा गाड्यांची सोय करण्यात येते. हजारो भाविक देवी  दर्शनाने मंत्रमुग्ध होतात.  हार, फुले, नारळ, खाद्यपदार्थ व खेळणी च्या दुकानातून गर्दी असते नवरात्रोत्सवातील सातव्या माळेला येथे भव्य यात्रा भरते नवमीस मोठा नवचंडी याग होतो.दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन होते आणि देवीला  पारंपारिक  दागिने चढवले जातात सीमोल्लंघनाच्या दिवशी मानाच्या काठ्या श्री रेणुका मातेच्या दर्शन घेऊन गेल्यानंतर उत्सवाची सांगता होते. 

 ललितापंचमीला या मंदिरात कुंकुमार्चन केले जाते, नवमीला नवचंडी याग  आणि दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजा केली जाते.  सप्तमीच्या दिवशी फुलोऱ्याचा प्रसाद महापूजा आदी पारंपारिक पद्धतीने केले जातात.  नवरात्रीत महापूजा रोज केली जाते. 

 यंदा मंदिर समितीच्या वतीने भाविकांना आवाहन करण्यात येत आहे की,कोरोनाचा फैलाव झाल्याने भक्तांना सुरक्षित ठेवण्यासाठी देवीला कोरोनाचा फैलाव कमी होऊ दे असे साकडे घालायचे  आहे. त्यामुळे मंदिरात येणाऱ्या  भक्ताने आंतरपथ्याचे सर्व नियम पाळावेत मास्क लावावा ठराविक वेळानंतर सॅनिटायझेशन प्रक्रियेला सहकार्य करावे.आत मध्ये दर्शनाला येण्याचा आग्रह कोणीही धरू नये, पोलिसांना सहकार्य करावे, लहान मुले व वृद्ध यांना शक्यतो दर्शनास आणण्याचे टाळावे असे आवाहन सुनिल गुरव यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments