शरद पवारांचा उमेदवारी स्वीकारण्यास नकार

शरद पवारांचा उमेदवारी स्वीकारण्यास नकार

आता विरोधकांकडून गोपाळकृष्ण गांधींना फोन करुन विनंती

वेब टीम नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली असून विरोधकांमध्ये संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा असताना त्यांनी मात्र स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे विरोधक आता कोणाला उमेदवारी देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातच आता विरोधक पश्चिम बंगालचे राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी देण्याती शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षातील काही नेत्यांनी फोनवरुन गोपाळकृष्ण गांधी यांच्याशी चर्चा केली असून राष्ट्रपतीपदाची उमेदवारी स्वीकारण्यासाठी विनंती केली आहे. २०१७ मध्ये गोपाळकृष्ण गांधी विरोधकांकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार होते. पण या निवडणुकीत व्यंकय्या नायडू यांनी त्यांचा पराभव केला होता.

सूत्रांच्या माहितीनुसार, विरोधकांकडून इतर काही नावांवरही विचार केला जात आहे. गोपाळकृष्ण गांधी २००४ ते २००९ दरम्यान पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. त्यांनी विरोधकांकडे विचार करण्यासाठी काही वेळ मागितला असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान त्यांच्याशी चर्चा केलेल्या नेत्यांनी त्यांनी सकारात्मकपणे प्रतिसाद दिल्याचं म्हटलं आहे.

गोपाळकृष्ण गांधी यांनी होकार दिल्यास एकमताने त्यांच्या नावाला संमती दिली जाण्याची शक्यता आहे. याआधी विरोधकांकडून त्यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली गेली असल्याने विरोध होणार नाही असा अंदाज आहे.

७७ वर्षीय गोपाळकृष्ण गांधी यांनी दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेत भारताचे उच्चायुक्त म्हणून काम केलं आहे. ते महात्मा गांधी आणि सी राजगोपालचारी यांचे नातू आहेत.

Post a Comment

0 Comments