महाविकास आघाडी अल्पमतात, ३९ आमदारांनी पाठिंबा काढला; शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात दावा

महाविकास आघाडी अल्पमतात, ३९ आमदारांनी पाठिंबा काढला; शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात दावा

महाविकास आघाडी सरकार कोसळणार? सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष

वेब टीम नवी दिल्ली : शिवसेना आणि बंडखोर एकनाथ शिंदे गट यांच्यात कायदेशीर लढाई सुरू झाली असून, महाविकास आघाडी सरकारच्या स्थैर्याबाबतचा तिढा कायम आहे. १६ बंडखोर आमदारांना पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि गटनेतेपदाच्या नियुक्तीला शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. दरम्यान याचिकेत शिंदे गटाने ३८ आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचा दावा केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊतांना ईडीचं समन्स, उद्या चौकशीला हजर राहण्याचा आदेश; जाणून घ्या प्रत्येक अपडेट

महाविकास आघाडी अल्पमतात असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात केला आहे. ३८ आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचं शिंदे गटाने याचिकेत नमूद केलं आहे. यासोबतच शिवसेना नेत्यांच्या जिवाला धोका असल्याचंही याचिकेत सांगण्यात आलं आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्याच्या व्हिडीओच्या लिंक सोबत देण्यात आल्या आहेत.

वाद सर्वोच्च न्यायालयात

शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना नोटीस बजाविण्यात आली असून, सोमवारी सायंकाळपर्यंत त्याला उत्तर द्यायचं आहे. मात्र, शिंदे गटाच्या वतीने या नोटिसींनाच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. तसंच नवे गटनेते नियुक्त करण्याच्या निर्णयालाही आव्हान देण्यात आलं आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे.

शिवसेनेच्या वतीने शिंदे गटाच्या खेळीला प्रत्युत्तर देण्याची तयारी करण्यात आली आहे. पक्षविरोधी वर्तन केलं तरीही आमदार अपात्र ठरू शकतात, याकडे शिवसेनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा आधार घेत लक्ष वेधलं. तसंच विधानसभा उपाध्यक्षांना अपात्रतेसाठी नोटिसा बजावण्याचा अधिकार असल्याचा दावाही त्यांनी केला.

बंडखोरांना केंद्राची सुरक्षा

शिवसेनेच्या १५ बंडखोरांना केंद्राने रविवारी ‘वाय प्लस’ सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेतला.  या बंडखोर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याने त्यांना सुरक्षा पुरविण्याची शिफारस करण्यात आल्यानंतर केंद्राने हे पाऊल उचललं. त्यामुळे या बंडखोरांसह त्यांच्या कुटुंबीयांनाही केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सुरक्षा कवच मिळालं.

उदय सामंतही शिंदे गटात

शिवसेनेतील आमदारांची गळतीही कायम आहे.  गेले चार दिवस तळय़ात-मळय़ात करणारे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे रविवारी गुवाहाटीमध्ये शिंदे गटात सहभागी झाले.  त्यामुळे शिंदे यांना साथ देणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या ३९ झाली आहे. आदित्य ठाकरे, सुभाष देसाई आणि अनिल परब हे तीनच मंत्री आता शिवसेनेत आहेत. उर्वरित सर्व मंत्र्यांनी गुवाहाटी गाठले आहे.

Post a Comment

0 Comments