'स्वयंभू ट्रान्सपोर्ट' वर अखेर गुन्हा दाखल
वेब टीम नगर : कोरोनाकाळात कडक लॉकडाऊन असताना दररोज १७५ ते २०० टन कचरासंकलनाची खोटी बिले सादर करून पालिकेला कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या ठेकेदार संस्थेला आता पोलीस चौकशीला सामोरे जावे लागून जेलची हवा खावी लागण्याची शक्यता आहे.या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झाले असून न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
महापालिकेच्या कचरासंकलन करणाऱ्या या ठेकेदारावर फसवणूक, तसेच आर्थिक अपहाराचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर येरलागड्डा यांनी दिला होता.
नगर शहरात कचरा संकलन करण्यासाठी महापालिकेने 2019 साली ‘स्वयंभू ट्रान्स्पोर्ट’ या संस्थेला ठेका दिला होता. या ठेकेदार संस्थेने अधिकारी आणि पदाधिकाऱयांना हाताशी धरून कचरासंकलनात घोटाळा केला होता. या घोटाळ्याची चौकशी व्हावी आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी शिवसेनेचे गिरीश जाधव यांनी तत्कालीन भाजप सरकार आणि महापालिकेकडे तक्रार अर्ज दिला होता. मात्र, त्याची दखल न घेतल्याने त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठाविला.
तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकेलवार, तसेच मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनाही जाधव यांनी वादी केले होते. त्यावर न्यायालयाने पोलीस चौकशीअंती निर्णय घेतला जाईल. अधिकाऱ्यांविरोधात अपहाराचे पुरावे मिळाल्यास त्यांनादेखील आरोपी करण्यात यावे, असे आदेशात नमूद केले आहे.
अहमदनगर शहरातील नागरिक कररूपाने महापालिकेला पैसे देत असतात मात्र त्या पैशांची उधळपट्टी करून भ्रष्टाचार करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे असून अधिकाऱ्यांच्या विरोधात नागरिकांनी रस्त्यावर उतरून जाब विचारणे गरजेचे आहे.
0 Comments