स्वागत मिरवणूक राणा दांपत्याला पडली महागात!
वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, रात्री उशिरापर्यंत ध्वनिप्रदूषण यासह विविध कलमांन्वये राणा दांपत्याविरोधात गुन्हे दाखल
वेब टीम अमरावती : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अमरावती आगमनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या स्वागत मिरवणुकीनंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, रात्री उशिरापर्यंत ध्वनिप्रदूषण यासह विविध कलमांन्वये राणा दांपत्यासह १५ कार्यकर्त्यांच्या विरोधात राजापेठ पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
तब्बल ३६ दिवसांनंतर राणा दांपत्याचे शनिवारी रात्री अमरावतीत आगमन झाले. नागपूर ते अमरावती या प्रवासादरम्यान, त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. येथील इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण केल्यानंतर राणा दांपत्याची स्वागत मिरवणूक राजकमल चौकात पोहचली. इर्विन चौकात राणा दांपत्याला विरोध करण्यासाठी भीम ब्रिगेडचे कार्यकर्ते जमले होते, पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
राणा दाम्पत्याचे नागपुरात ‘हनुमान चालीसा’ पठण
मिरवणूक राजकमल चौकात पोहोचल्यावर युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. राणा दांपत्याचे स्वागत भल्या मोठ्या हाराने करण्यात आले. यावेळी नवनीत राणा यांनी गदा फिरवून कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला प्रतिसाद दिला. राणा दांपत्याने रवीनगर परिसरातील हनुमान मंदिरात पोहचून हनुमान चालिसाचे पठण आणि आरतीत सहभाग घेतला. रात्री १० वाजेनंतरही या ठिकाणी भोंग्यांचा वापर सुरू होता, असा आक्षेप आहे.
राणा दांपत्य शंकरनगर परिसरातील निवासस्थानी पोहचल्यानंतर त्यांचा दुग्धाभिषेक करण्यात आला. राणा दांपत्याच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. या स्वागत मिरवणुकीदरम्यान रस्ता अडवणे, वाहतुकीला अडथळा निर्माण करणे आणि ध्वनिप्रदूषणासाठी कारणीभूत ठरणे, यासह विविध कलमांन्वये नवनीत राणा, रवी राणा आणि इतर १५ जणांच्या विरोधात राजापेठ पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिली.
0 Comments