“बाळासाहेब भोळे होते, मी धूर्त आहे, फसणार नाही”
उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा
वेब टीम मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष भाजपाच्या ‘ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नाही’ या टीकेला थेट प्रत्युत्तर दिलंय. “हो बरोबर आहे, बाळासाहेब ठाकरे भोळे होते. त्यावेळी भाजपाने बाळासाहेबांना वेळोवेळी कसे फसवले हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे,” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच त्यामुळेच मी भाजपासोबत धुर्तपणे वागत असल्याचं त्यांनी नमूद केलं. उद्धव ठाकरे राज्याच्या राजकारणाचा चौकोनी आढावा घेणाऱ्या मुलाखतीत म्हटले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “माझ्यावर आरोप होतो की ही शिवसेना बाळासाहेबांची नाही, मी म्हटलं हो बरोबर आहे. बाळासाहेब ठाकरे भोळे होते. त्यावेळी भाजपाने बाळासाहेब ठाकरे यांना वेळोवेळी कसे फसवले हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे मी नाही म्हटलं तरी थोडासा धुर्तपणे भाजपासोबत वागतो आहे.”
“भाजपा हिंदुत्वाच्या आडून जे डाव साधत होतं त्याकडे बाळासाहेबांनी दुर्लक्ष केलं”
“मी भोळा नाही. माझे वडील भोळे होते. त्यांनीच माझ्या रक्तात हिंदुत्व भिनवलं आहे, पण हिंदुत्वाच्या आडून भाजपा त्यांचे जे डाव साधत होता त्याकडे बाळासाहेब कानाडोळा करत होते, मी तसं करणार नाही,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
“महाराष्ट्राची संस्कृती पाहता भाजपाने महाराष्ट्र कोठे नेऊन ठेवलाय?”
उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही वाईट कारभार करत असू तर जरूर आम्हाला जनतेसमोर उघडं पाडा. मात्र, भाजपाने ‘कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ असा प्रश्न विचारला होता. आता त्यांना विचारण्याची गरज आहे की, महाराष्ट्राची संस्कृती पाहता भाजपाने महाराष्ट्र कोठे नेऊन ठेवलाय? ही सुडबुद्ध तुमच्यात कोठून आली, ही कोणती संस्कृती आहे, तुमच्या रक्तात सुडबुद्धी कशी आली, हा विकृतपणा तुमच्याकडे कसा आला?”
“विकृत, सडलेलं, नासकं राजकारण कदापि महाराष्ट्राची संस्कृती नव्हती”
“हे विकृत, सडलेलं, नासकं राजकारण कदापि महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. महाराष्ट्र हे कदापि मान्य करणार नाही. निवडणुकीत लोक यांचा निर्णय करतील, पण सडक्या, कुजक्या आणि नासलेल्या विचारांचा घाणेरडेपणा राजकारणात आणला, तर लोकच यांना जाब विचारतील, की कोठे नेताय महाराष्ट्र आमचा. हा आमचा महाराष्ट्र नाही. आमचा साधुसंतांचा, शिवरायांचा महाराष्ट्र असा नाहीये. असं सडकं, नासकं, सुडबुद्धीचं राजकारण मला किंवा महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित नाही. तेही कशासाठी तर केवळ मला पाहिजे,” असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.
0 Comments