काॅंग्रेस शहराध्यक्ष भुजबळ यांचा स्वगृही प्रवेश

काॅंग्रेस शहराध्यक्ष भुजबळ यांचा स्वगृही प्रवेश

भाजपचे बळ वाढणार : आशिष शेलार

वेब टीम नगर : शहर काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.पक्षाचे राज्य नेते आशिष शेलार यांनी श्री भुजबळ यांचे स्वागत केले.शहरजिल्हाध्यक्ष भैय्या गंधे व पक्षाचे स्थानिक नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.भुजबळ यांच्यामुळे  भाजपचे बळ निश्चित वाढणार आहे,असा विश्वास श्री शेलार यांनी व्यक्त केला.

श्री भुजबळ यांनी भाजप प्रवेशामागची भुमिका स्पष्ट करणारे निवेदन प्रसिध्दीला दिले आहे.त्यात ते म्हणतात की, काॅंग्रेस पक्षात काम करणार्‍या व्यक्तींची दखल घेण्यात येते हा इंदिराजींच्या काळापासूनचा इतिहास आहे. प्रामाणिकपणे काम करुन पक्ष संघटना वाढीस लावण्यासाठी काम करावे लागते व नेमके तेच काम मी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न पक्षात केला. प्रारंभीच्या काळात पक्षात काम करण्यास मला प्रोत्साहन मिळाले. एवढेच नाही तर शहराध्यक्ष पदावर बहुमताने लागोपाठ दोन वेळा संधी मिळाली. या काळात पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर होते. त्यांनी प्रोत्साहनच दिले.

 त्यामुळे शहरात पक्ष संघटना मजबूत करुन जुन्या-नव्याची एक मजबुत फळी निर्माण केली. पक्ष संघटनेची जबाबदारी मी समर्थपणे सांभाळण्याचा प्रयत्न करतांना सत्तेचे लाभाचे पद , नगरसेवक पदापासून दूर रहावे लागले. याची खंत कधी बाळगली नाही. पक्षाने श्री.कोतकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर शहरातली पक्ष संघटना जिवंत ठेवण्याचे मोठे आव्हान माझ्यासमोर होते; तेही पेलण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. परंतु पक्षासाठी प्रामाणिक काम करणार्‍या निष्ठावान कार्यकर्त्यांना अंतर्गत गटबाजीचा फटका बसतो. तसा फटका मलाही जाणवला. एकवेळ पक्षासाठी  निष्ठेने काम केले नाही तरी चालू शकते पण, स्थानिक नेत्यांची मनधरणी करणे, त्यांच्यापुढे लाचार होणे असे प्रकार जर आपण स्वीकारले तर पक्षात मानाचे स्थान. नाही तर सपत्नीपणाची वागणूक मिळते हा अनुभव पक्षात गेल्या 3-4 वर्षात मी व शहर काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अनुभवला. 

पक्षाच्या निष्ठावंतांना डावलून निष्ठावंतांवर खोटे आरोप करुन पक्षातून बाहेर जावे अशा हेतूने कारस्थान झाले, त्याचा मी बळी गेलो. वास्तविक सन 2010 नंतर पक्षाचे शहरात काम करतांना पक्ष जिवंत ठेवतांना माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांला काय यातना झाल्या याचा विचार करुन स्थानिक पक्षाच्या नेतृत्वाकडून सकारात्मक शब्दात भावना व्यक्त करता आल्या नाहीत.उलट आरोप झाले. पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली, त्यांचे प्रामाणिक काम करुनही या नेत्यांना त्याची जाणिव राहिली नाही. पक्षात स्वार्थ व प्रसिद्धी हेतूने जर मी काम केले असते तर शहर काँग्रेसचे पदाधिकारी, सदस्य माझ्या सोबत आजपर्यंत राहिलेच नसते ? माझ्यावर कारवाई करुन मोठा अन्याय केला. तरीही शहरातला एकही कार्यकर्ता, पदाधिकार्‍यांनी माझी साथ सोडली नाही.खरं तर आज मी भाजपमध्ये प्रवेश करतो हे मला साथ देणार्‍या सहकार्‍यांच्या शब्दाखातर. कारण या सहकार्‍यांनी मला प्रति प्रश्न केला. आजपर्यंत आम्ही तुमचे ऐकले आता तुम्ही आमचे ऐका .मला त्यांचे ऐकावे लागले. मी काँग्रेस सोडून कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असता तरी त्या-त्या पक्षातील नेते, कार्यकर्त्यांनी सहकारी या भावनेने मला जवळ केले असते. त्यामुळे पक्षबदल करताना कोणत्या पक्षात जाणे हा निर्णय घेणे  तसे अवघड होते. पण, माझ्या सहकार्‍यांच्या शब्दाला मान देऊन मी भाजपत प्रवेश करत आहे. 

काँग्रेस पक्षात निष्ठेने काम करुनही ज्यांना मार्गदर्शक सहकारी म्हणून स्वीकारले त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी मला सापत्नीपणाची वागणूक देत अपमान करत मला पक्ष सोडण्यास भाग पाडले. भाजप या पक्षात मी पूर्वी कार्यरत होतो. जेव्हा भाजप सोडून कॉग्रेसमध्ये आलो तरी भाजप पक्षातील (शहरातील) अनेकांशी माझा स्नेहाचा संबंध कायम राहिला. जिथे जीवाभावाचे सहकारी आहे आणि माझ्या बरोबर असलेले जीवाभावाचे सहकारी म्हणतात या दोन्हीची सागंड घालत .विशेषत: मा.भैय्या गंधे,ॲड.आगरकर,वसंत लोढा आदि या सर्वांच्या म्हणण्यानुसार मी यापुढेही कार्यरत असणार आहे. पद मिळो, सत्ता मिळो अथवा न मिळो पण, संघटन महत्वाचे आहे. या माध्यमातून शहराचा विकास, सामान्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्नात मी सहभागी असणार आहे.त्याच कामाचा  पुनश्च श्री गणेशा आजपासून मी करीत आहे,असे श्री भुजबळ यांनी निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे  . 


Post a Comment

0 Comments