राज्यसभेच्या सहाव्या जागेचा उमेदवार ठरला : अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
वेब टीम मुंबई : शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेवर कुणाला संधी मिळणार याचा सस्पेन्स आता संपला आहे. शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी कोल्हापूरच्या संजय पवार यांचं नाव फायनल झालं आहे, फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.
संजय राऊत म्हणाले की, "संभाजीराजेंचा आम्ही आदर करतो, म्हणूनच त्यांना पक्ष प्रवेशासाठी निमंत्रण दिलं. या आधी शाहू महाराजांनी शिवसेनेच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. मालोजीराजेंनी काँग्रेसमधून आणि स्वत: संभाजीराजेंनी राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवली आहे. त्यामुळे छत्रपतींना कोणत्याही पक्षाचं वावडं नसावं."
संजय राऊत म्हणाले की, "संजय पवार हा शिवसेनेचा मावळा आहे. त्यांनी पक्षासाठी आतापर्यंत खूप काम केलं आहे. त्यामुळेच पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आता फक्त त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे."
कोण आहेत संजय पवार?
शिवसनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख असलेले संजय पवार हे गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. गेल्या 9 वर्षांपासून ते कोल्हापूर जिल्हाप्रमुख म्हणून सक्रिय आहेत. स्थानिक राजकारणावर त्यांची मजबूत पकड आहे. कोल्हापुरात पक्षबांधणीचं जोमानं काम केलं. आण्णासाहेब पाटील महामंडळाचे ते उपाध्यक्ष आहेत. एवढंच नाहीतर, तीन वेळा कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते. शिवसैनिक ते नगरसेवक आणि त्यानंतर जिल्हाप्रमुख असा सेनेतील त्यांचा प्रवास. उच्चशिक्षित आणि संघटन कौशल्य असल्यानं पश्चिम महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये संजय पवार यांच्या नेतृत्त्वाची छाप आहे. तसेच, एक कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख आहे. यासोबतच, सिमा प्रश्नी आंदोलनताही तब्बल 30 वर्षे संजय पवार सहभागी आहेत.
संभाजीराजेंनी प्रस्ताव नाकारल्यास कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा सुरु होती. यावर बोलताना संधी मिळाली तर आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली होती. संजय पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं होतं की, "मला पक्षाकडून अद्याप उमेदवारीबाबत सांगण्यात आलेलं नाही. पण माझ्या नावाची चर्चा असल्याचं मी ऐकतोय. मला संधी मिळाली तर आनंदच आहे. सध्या या चर्चेमधेच मी आनंद मानतोय. संभाजीराजे छत्रपती आणि त्यांच्या घराण्याचा आम्ही आदरच करतो. संभाजीराजे छत्रपती यांनी काय करावं? याबाबत मी त्यांना सूचना करणार नाही. माझ्या नावाची चर्चा ही संभाजीराजेंवर दबाव टाकण्यासाठी नाही."
0 Comments