आ.संग्राम जगताप यांच्या गाडीला पहाटे अपघात

आ.संग्राम जगताप यांच्या गाडीला पहाटे अपघात 

काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आ. जगताप यांची केली विचारपूस 

वेब टीम नगर : राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्या गाडीला पहाटे मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर अपघात झाला होता. काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे हे देखील मुंबईकडे पहाटेच नगर शहरातील नागरिकांच्या कामांसंदर्भात रवाना झाले आहेत. त्यांना अपघाताची घटना समजल्यानंतर त्यांनी आ. जगताप यांना फोन करत त्यांची विचारपूस केली आहे.

याबाबत काळे यांना विचारले असता, ते म्हणाले की आ. जगताप यांच्या गाडीला झालेला अपघात दुर्दैवी आहे. ते सुदैवाने यातून वाचले. मी मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवे वरून जात असताना त्यांची अपघातग्रस्त गाडी देखील पाहिली. गाडी पाहिली असता जोराची धडक झाली असल्याचे दिसते आहे. मात्र दैव बलवत्तर असल्यामुळे त्यातून ते वाचले.

काळे हे जगताप यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. तरी देखील त्यांनी जगताप यांची विचारपूस केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याबाबत काळे यांना विचारले असता काळे म्हणाले की, माझा आणि काँग्रेसचा आ.जगताप यांच्या समवेत असणारा संघर्ष हा वैचारिक आणि राजकीय स्वरूपाचा आहे. तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही तेवढाच तीव्र राहणार आहे. याबाबत कुठलीही शंका असण्याचे कारण नाही.

मात्र राजकीय विरोधक असले तरी देखील एखाद्या अडचणीच्या प्रसंगांमध्ये ते विरोधक असले तरी देखिल त्यांची विचारपूस करणे ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि त्यामुळेच त्यांची मी विचारपूस केली आहे.
Post a Comment

0 Comments