चांगला शिक्षक होण्यासाठी बदलही स्वीकारावे लागतील

चांगला शिक्षक होण्यासाठी बदलही स्वीकारावे लागतील

गटशिक्षणाधिकारी रवींद्र कापरे; व्ही स्कुल ॲप उपक्रमातील गुणवंत शिक्षकांचा सन्मान

वेब टीम नगर  :  ऑनलाईन शिक्षण प्रणालीत बहुतेक शिक्षक अजुनही बालवाडीतच आहेत. त्यामुळे भीतीपोटी नव्हे तर, बदलत्या काळाची गरज म्हणून शिक्षकांना ही प्रक्रिया समजून व शिकून घ्यावीच लागेल. चांगला शिक्षक होण्यासाठी बदल स्वीकारावेच लागतील. तसेच मोबाईलचा वापर केवळ गेमिंगसाठीच नव्हे, तर मुलांना शिकण्यासाठीही होतो, हेही समजून सांगावे लागेल, अशी भूमिका गटशिक्षणाधिकारी रवींद्र कापरे यांनी आज येथे व्यक्त केली. 

नगर तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या व्ही स्कुल ॲप आशय निर्मिती उपक्रमात सहभागी होवून उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षकांचा गौरव करताना ते बोलत होते. विस्तार अधिकारी निर्मला साठे, विस्तार अधिकारी मंदाकिनी लोटके, 'ओपा'च्या डायरेक्टर ऋतुजा जवे व राहुल बांगर, मुख्याध्यापक सुनील अकोलकर,  समन्वयक प्रिया कुलकर्णी, सुधीर जोगदंड, तंंञस्नेही अमोल मुरकुटे, आदी यावेळी उपस्थित होते. 

गटशिक्षणाधिकारी रवींद्र कापरे म्हणाले, 'व्हि स्कुल ॲपच्या माध्यमातून शिक्षकांच्या बुध्दीमत्तेचा उपयोग वंचित मुलांसाठी जास्त झाला, याचे विशेष समाधान आहे. अनेक प्रगत राष्ट्रांमध्ये शिक्षकांना सेवानिवृत्तीची ५८ वर्षे वयाची अटच नाही. शिकविणे व शिक्षक कधीच संपत नाही. उलट अनुभव वाढतो. त्यामुळे शक्य असेल तोवर शिक्षकांनी आपले ज्ञान विद्यार्थ्यांना दिलेच पाहिजे. कोणत्याही शिक्षण प्रणालीत विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून काम व्हायला हवे. नवीन तंत्रज्ञानातून शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. ती शिकूनच घेतली पाहिजेत. नवे बदल स्वीकारण्याची तयारी ठेवून शिक्षकांनी सतत कार्यमग्न रहायला हवे.'

विस्तार अधिकारी निर्मला साठे यांनी मनोगत व्यक्त केले. व्ही स्कुल ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास, हाच मुख्य हेतू होता. त्याचे फलित मिळाले. घरबसल्या विद्यार्थ्यांना यातून शिकण्याची संधी मिळाली, असे त्या म्हणाल्या. 

'ओपा'च्या डायरेक्टर ऋतुजा जवे यांनी सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यातून साधारण १२ लाख विद्यार्थ्यांनी व्ही स्कुल ॲपच्या माध्यमातून शिक्षण घेतले. त्यातही ७० टक्के मुलं सामान्य मजुरांची असल्याचे त्या म्हणाल्या. 

मुख्याध्यापक सुनील अकोलकर, शिक्षक प्रतिनिधी संगिता गुंड,तंत्रस्नेही रहेमान शेख यांनी मनोगत व्यक्त केले. 

व्ही स्कुल ॲपच्या समन्वयक प्रिया कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. अध्यापक स्वाती अहिरे यांनी सूत्रसंचालन केले. अध्यापक जालींदर सांगळे यांनी आभार मानले. (फोटो- शिक्षक )

Post a Comment

0 Comments