लेकीसाठी आईची बिबट्याशी झुंज

लेकीसाठी आईची बिबट्याशी झुंज 

जेवायला बसलेल्या मुलीवर बिबट्याचा हल्ला, आईने काठीने हल्ला करत वाचवला मुलीचा जीव

वेब टीम चंद्रपूर : येथील  दुर्गापूर येथे एका तीन वर्षीय चिमुरडीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवार रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास वॉर्ड क्रमांक १ मध्ये ही घटना घडली. मात्र मुलीच्या आईने बिबट्यावर काठीने प्रहार करीत आपल्या मुलीचा जीव वाचविला. दरम्यान संतप्त लोकांनी वन विभागाच्या १० कर्मचाऱ्यांना डांबून ठेवलं. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. ५ तासानंतर या सर्वांना सोडण्यात आले.

मागील अनेक महिन्यापासून बिबट्याने दुर्गापुर परिसरात धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत बिबट्याने तीन जणांना ठार केले आहे. यामध्ये लहान व मोठ्यांची समावेश आहे. मात्र वनविभागाने अजूनही त्या बिबट्याचा बंदोबस्त केला नाही. मध्यंतरी एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते. मात्र तो बिबट्या वनविभागाच्या जाळ्यात सापडलाच नव्हता. त्यामुळे त्या नरभक्षकाचे हल्ले सतत सुरुच होते.

मंगळवारी रात्री ९ वाजता आरक्षा पोप्पूलवार ही तीन वर्षीय चिमुकली खेळून झाल्यावर जेवायला बसली होती, त्याचवेळी अचानक बिबट्याने आरक्षावर हल्ला केला, मुलीवर झालेला हल्ला बघता आईने त्या बिबट्यावर काठीने वार करीत बिबट्याच्या तावडीतून मुलीला सोडविले. दुर्गापूर पोलिसांनी तात्काळ त्या मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वेळेवर उपचार मिळाल्याने मुलीची प्रकृती आता बरी आहे.

मात्र वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे दुर्गापुरातील नागरिक चांगलेच संतापले. वनविभागाचे RFO राहुल कारेकर व त्यांची चमू रात्री दुर्गापुरात पोहचली होती. मात्र त्यावेळी त्यांना गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. गावकऱ्यांनी RFO सहित वनविभागाच्या 10 कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले. जोपर्यंत त्या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश वनविभाग देणार नाही तोपर्यंत आम्ही वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सोडणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. तब्बल ५ तासांच्या नाट्यक्रमानंतर वनविभागाच्या वतीने त्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश वनविभागाने जारी केले. त्यामुळे गावकऱ्यांनी RFO कारेकर सहित असलेल्या १० कर्मचाऱ्यांची सुटका केली. या प्रकारामुळे दुर्गापूर येथे तणावाचे वातावरण होते. बिबट्याचा शोध घेणे सुरू आहे. 

Post a Comment

0 Comments