ड्रीम सिटीचे पाणी कनेक्शन तोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

ड्रीम सिटीचे पाणी कनेक्शन तोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

ड्रीम सिटीचे पाणी कनेक्शन तातडीने पूर्ववत करावे अन्यथा रास्ता रोको, संतप्त रहिवाशांचे महानगरपालिकेत आंदोलन

वेब टीम नगर : नगर-कल्याण रोडवरील ड्रीम सिटी गृहप्रकल्पाचे पाण्याचे कनेक्शन तोडण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे या प्रकल्पातील सुमारे 400 कुटुंबांवर पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. महानगरपालिकेने ड्रीम सिटीचे नळ कनेक्शन पूर्ववत जोडावे व नियमित पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी रहिवाशांनी महानगरपालिकेत ठिय्या आंदोलन केले. पाणीपट्टी नियमित व वेळेत भरत असताना पाणी तोडण्यात आल्याने रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त करीत अधिकार्यांना धारेवर धरले. 

पाणी तोडण्याचा उद्योग करणार्याा नगरसेवकांवर व त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करावा तसेच तातडीने पाणी कनेक्शन पुन्हा जोडावे अन्यथा नगर-कल्याण महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. रहिवाशांनी पोलिस अधीक्षकांनाही याबाबतचे निवेदन दिले आहे.

यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ.प्रदीप पटारे यांना निवेदन देण्यात आले. रहिवाशांनी सांगितले की, महानगरपालिका हद्दीत असलेल्या ड्रीम सिटीला महानगरपालिकेने अधिकृत पाणीपुरवठा कनेक्शन दिलेले आहे. सर्व रहिवाशी नियमित पाणी पट्टीही भरतात. परंतु, शनिवारी 7 मे रोजी शिवसेनेचे नगरसेवक विजय पठारे, अमोल येवले व त्यांच्या काही साथीदारांनी ड्रीम सिटीला पाणीपुरवठा करणारे कनेक्शन तोडण्याचे काम केले. त्यामुळे ड्रीम सिटीमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. 

ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अशा प्रकारे एखाद्या प्रकल्पाचे अधिकृत पाणी कनेक्शन तोडण्याचा अधिकार संबंधितांना कोणी दिला, असा संतप्त सवाल करीत रहिवाशांनी कनेक्शन तोडणारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. नळ कनेक्शन आजच्या आज पूर्ववत न केल्यास आक्रमक रास्ता रोको करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. तीन दिवसांपासून संपूर्ण ड्रीम सिटी पाण्यापासून वंचित आहे.

 अशा परिस्थितीत काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास संपूर्णपणे महापालिका प्रशासन जबाबदार राहणार आहे. आंदोलनावेळी सुनिल तनपुरे, अतुल डागा, चिराग पटेल, संतोष मेहेत्रे, सागर वलुसा, गंगाधर नरसाळे, चंद्रकांत कुसळकर, बी.वाय.रोहोकले, वर्षा झावरे, छाया झावरे, शोभा मेहेत्रे, कृष्णा धूत, सुवर्णा लोढा, सिंधू घोरपडे, पूनम माळी, आकांक्षा ठाणगे आदींसह सुमारे 200 रहिवासी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments