जाती शोषक व जात मंडूक राजकारण्यांविरोधात आक्रोश डिच्चू कावा

जाती शोषक व जात मंडूक राजकारण्यांविरोधात आक्रोश डिच्चू कावा

स्वराज्य राबविण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन

वेब टीम नगर : जाती-धर्माचे मुद्दे उकरुन काढून समाजात द्वेष पसरविणार्‍या जाती शोषक व जात मंडूक राजकारण्यांविरोधात पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने आक्रोश डिच्चू काव्याची घोषणा करण्यात आली आहे. प्रत्येक नागरिकाने भारतीय म्हणून समाजात वावरताना जाती-धर्मात भांडणे लाऊन राजकीय पोळी भाजणार्‍या जात मंडूक राजकीय पुढार्‍यांना डिच्चू कावा तंत्राने कायमचा घरचा रस्ता दाखविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लाखो लोकांनी स्वराज्य मिळवण्यासाठी बलिदान दिले. मात्र स्वराज्य राबविण्यासाठी नागरिकांना भारतीय म्हणून पुढे येण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

जाती शोषक व जात मंडूक राजकारण्यांमुळे राज्याचा विकास खुंटला आहे. कोरोनाच्या संकटाने संपुर्ण मानवजातीला एकतेचा धडा दिला. कोरोना संपताच पुन्हा जातीवादाची बीजे पेरुन मतांच्या रुपाने त्याचे फळ चाखण्याचे काम जात मंडूक नेते करीत आहे. अशा जात मंडूकांना शुध्दीवर आणण्यासाठी भारतीयांनी एकात्मतेचे तत्वज्ञान स्विकारुन डिच्चू कावा तंत्राने द्वेष पसरविणार्‍यां विरोधात उभे राहण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मनिरपेक्ष मावळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केले. शासन प्रशासनामध्ये क्रांती करुन न्याय व कायद्याचे राज्य राबविले. आजही त्यांचे दिशादर्शक कार्य सर्वांच्या स्मरणात आहे. हा आदर्श समोर ठेऊन जाती शोषक व जात मंडूकांविरोधात डिच्चू कावा करण्यासाठी संघटनेने पुढाकार घेतला आहे.

स्वराज्य राबविण्यासाठी लोक पुढे येत नसल्याने, त्यांना जाती-धर्मात अडकविण्यात येत आहे. आम आदमी पार्टीने दिल्ली व पंजाबमध्ये जात आणि धर्मनिरपेक्ष तत्व प्रणाली वापरली आणि आपचे सरकार आणले. दिल्लीत उत्तमरित्या त्यांचे कार्य सुरु आहे. सामान्य माणसाला शिक्षण, आरोग्याच्या सोयी-सुविधा, मुलभूत नागरी प्रश्‍न सोडविण्याची अपेक्षा असते. मात्र राजकारणी धर्म, जातीच्या नावावर सर्वसामान्यांना लढवून मुळप्रश्‍नांपासून त्यांचे लक्ष विचलीत करत असल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे. आक्रोश डिच्चू काव्यासाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, हिराबाई ग्यानप्पा, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, पै. नाना डोंगरे, जालिंदर बोरुडे, विजय भालसिंग, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.

Post a Comment

0 Comments