अखेर राणा दाम्पत्याचे आंदोलन मागे

अखेर राणा दाम्पत्याचे आंदोलन मागे 

वेब टीम मुंबई : हनुमान चालिसावरून राज्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे, कारण अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

मात्र राणा दाम्पत्याकडून आंदोलन मागे घेण्याची घोषणा करण्यात आली असून कोणाच्याही दबावाला न घाबरता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या मुंबई दौरा असून त्यांच्या दौऱ्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आंदोलन मागे घेत आहोत, अशी घोषणा आमदार रवी राणांनी केली आहे.

दरम्यान, गेल्या अडीच वर्षांपासून राज्यावर संकटं येत आहेत. ती दूर व्हावीत यासाठी मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणावी असं आवाहन आम्ही केलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसा म्हटली नाही. उलट त्यांच्या शिवसैनिकांनी आमच्या अमरावतीमधल्या घरावर हल्ला केला. दगडफेक केली.

आमच्या मुंबईतल्या घराखालीदेखील मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनं आमच्या घरावर हल्ले झाले. यासाठी जबाबदार असलेल्या सर्व शिवसैनिकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राणांनी यावेळी केली आहे.

दरम्यान, उद्या पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा आहे. त्यात कोणतंही विघ्य येऊ नये यासाठी आम्ही आंदोलन मागे घेत आहोत, अशी घोषणा रवी राणांनी केली आहे.

तसेच मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसा म्हटली नाही. हा हनुमानभक्तांचा अपमान आहे. त्याचं उत्तर मतदार देतील. गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचं डिपॉजिट जप्त झालं, तशीच अवस्था आता महाराष्ट्रात होईल, असेही रवी राणा यावेळी म्हणाले आहेत.

Post a Comment

0 Comments