हायकोर्टाचा दिलासा मिळताच सोमय्या आक्रमक

हायकोर्टाचा दिलासा मिळताच सोमय्या आक्रमक

म्हणाले “आज संध्याकाळी येतोय"

वेब टीम मुंबई : आयएनएस विक्रांत निधी अपहार प्रकरणामुळे अडचणीत असलेल्या भाजपा नेते किरीट सोमय्यांना मुंबई हायकोर्टाने अटकेपासून दिलासा दिला आहे. किरीट सोमय्या यांनी अटक टाळण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. सत्र न्यायालयाचा आदेश चुकीचा असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला होता. कोर्टाने किरीट सोमय्या यांना अटकेपासून संरक्षण देताना पोलिसांसमोर चौकशीला हजर राहण्याची सूचना केली आहे. दरम्यान कोर्टाने दिलासा देताचा इतक्या दिवसांपासून बेपत्ता असल्याचा दावा होत असलेल्या सोमय्यांनी ट्वीट करत पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे.

हायकोर्टाने किरीट सोमय्या यांना अटकेपासून दिलासा देताना तक्रार अस्पष्ट आणि प्रसारमाध्यमांच्या वृत्तांवर आधारलेली असल्याचं निरीक्षण नोंदवलं. तसंच कोर्टाने किरीट सोमय्यांना चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहावं लागणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे.

५७ कोटी जमवल्याचा आरोप तक्रारदाराने कशाच्या आधारे केला याबाबतही तक्रारीत कुठेच उल्लेख नाही असं कोर्टाने यावेळी सांगितलं. १८ एप्रिलपासून पुढील चार दिवस सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश यावेळी कोर्टाने दिले आहेत. तसंच अटक झाल्यास ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

“अंतरिम दिलासा/जामीन दिल्याबद्दल मी मुंबई हायकोर्टाचे आभार मानतो. ठाकरे सरकार ५७ कोटींच्या विक्रांत घोटाळ्याचा एकही कागद सादर करु शकलेलं नाही. ते उघड पडले आहेत. जोपर्यंत ठाकरे सरकारच्या डर्टी डझनला शिक्षा मिळत नाही तोपर्यंत या घोटाळेबाज सरकारविरोधात आमचा लढा सुरु राहील,” असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत. दरम्यान आज संध्याकाळी ६ वाजता ते मुंबई विमातनळावर दाखल होणार आहेत.

किरीट सोमय्या यांनी अटक टाळण्यासाठी मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सोमय्या यांचा मुलगा नील याचाही अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. आयएनएस ‘विक्रांत’ला भंगारात जाण्यापासून वाचवण्यासाठी सोमय्या यांनी निधी गोळा केल्याचे, परंतु ते राज्यपालांच्या कार्यालयात जमा केले नसल्याचे पुराव्यांतून स्पष्ट होते, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन सोमवारी फेटाळला होता.

Post a Comment

0 Comments