राज्यात आजपासून (मंगळवार) भारनियमन

राज्यात आजपासून (मंगळवार) भारनियमन 

वेब टीम मुंबई : मुंबई, ठाणे, नवीमुंबई वगळता राज्यातील इतर जिल्ह्यांत हे भारनियमन करण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रात आधी  पासूनच भारनियमन सुरू आहे.

आता शहरी भागातही ते होणार असून दररोज किमान दोन तासांचे भारनियमन होणार आहे. भारनियमन करण्यासाठी काही निकष ठरविण्यात आले आहेत.

ज्या भागात वीजचोरी, वीज वितरण हानी आणि बिलाची वसुली कमी आहे अशा भागात प्राधान्याने आणि जास्तीचे भारनियमन केले जाणार आहे.

त्यानुसार विदर्भ, मराठवाडा, खान्देश या भागातील नागरिकांना जास्त भारनियमन सहन करावे लागणार आहे. राज्यात ऊन तापत असल्याने घरगुती वीज वापरासह औद्योगिक व कृषिपंपाचा वीजवापरदेखील वाढला आहे. त्यामुळे विजेची मागणी विक्रमी २८ हजार मेगावॉटच्या घरात गेली आहे.

पंधरा दिवसांपासून महावितरणकडील विजेची मागणी सातत्याने २४ हजार ५०० ते २४ हजार ८०० मेगावॉट दरम्यान आहे. विजेच्या मागणीचा चढता आलेख लक्षात घेता ही मागणी लवकरच २५ हजार ५०० मेगावॉटवर जाण्याची शक्यता आहे. त्याच वेळी रात्रीच्या कालावधीतदेखील मागणी २२ हजार ५०० ते २३ हजार मेगावॉटवर जाते. 

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने मंजुरी दिलेल्या निकषांप्रमाणे शहरी व ग्रामीण भागातील काही वीज वाहिन्यांवर आगामी काळात अधिकचे भारनियमन करावे लागू शकते.

हे टाळण्यासाठी वीजग्राहकांनी सहकार्य करावे आणि वीज बचत करावी, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे गेल्या काही दिवसांपासून राज्यात भारनियमनाची वेळ येऊ देणार नसल्याचे सांगत होते.

त्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन वीज वितरण कंपनीला खासगी वीज खरेदीचे अधिकार देण्यात आले. मात्र, तरीही पुरेशी वीज उपलब्ध होत नसल्याने आता भारनियमन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्य म्हणजे एकीकडे ही तयारी सुरू असताना संभाव्य भारनियमनाची तयारी वीज कंपनीने ३१ मार्चलाच सुरू केल्याचे दिसून येते.

Post a Comment

0 Comments