“सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी भाजपाच”; नाना पटोलेंचा निशाणा
वेब टीम कोल्हापूर : राज्यातलं वीज संकट, शरद पवारांच्या घरावर झालेला हल्ला, भाजपा नेत्यांचे आरोप प्रत्यारोप अशा अनेक विषयांवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी हे भाजपाचेच पंतप्रधान आहेत, देशाचे नाहीत, अशी टीकाही केली. तसंच सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी भाजपाच आहे, असं विधानही त्यांनी केलं आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने नाना पटोले शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अनिल देशमुखांसंदर्भातला प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा नाना पटोले म्हणाले, “आम्ही सुरूवातीपासूनच सांगितलं की सत्य पराजित हो नही सकता. त्रास होऊ शकतो. केंद्रीय तपास यंत्रणा, केंद्रातलं भाजपाचं सरकार सत्तेचा दुरुपयोग करून त्यांचा वापर करत आहे. त्यातलं आज ना उद्या खरं जनतेसमोर येणारच आहे. भ्रष्टाचारी तर सगळ्यात जास्त भाजपाच आहे. आता भगवान श्रीरामाच्या नावाने पैसे गोळा केले, त्याचा हिशोब देणार नाहीत, आयएनएस विक्रांतच्या नावाने पैसे गोळा केले, किरीट सोमय्यांचं त्यावेळचे ट्वीट आहे, आता ते म्हणतात की आम्ही पैसे गोळा केलेच नाही.
पटोले पुढे म्हणाले, “आज जी परिस्थिती आहे, या परिस्थितीला भाजपा ज्या पद्धतीने विरोधकांना आणि केंद्रातल्या भाजपाच्या धोरणाच्या विरोधात…आम्ही कोणा व्यक्तीविषयी बोलत नाही, पण त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे देश जो डबघाईला आलाय, त्याच्या विरोधात बोलणाऱ्यांवर ईडीची कारवाई करू, सीबीआय मागे लावू अशा प्रकारचं कृत्य चाललेलं आहे. हे हुकुमशाहीकडे नेत आहे, हिटलरशाही कडे नेत आहे. देशात अघोषित आणिबाणी जाहीर करण्याचं पाप केंद्रातलं सरकार करत आहे”.असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
0 Comments