पंतप्रधानपदावरून इम्रानखान पायउतार .... !

पंतप्रधानपदावरून इम्रानखान पायउतार .... !

 वेब टीम लाहोर : पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचा पहिला अंक शनिवारी मध्यरात्री पाकिस्तानच्या संसदेमध्ये झालेल्या हाय व्होल्टेज ड्रामाने संपला. रात्री उशीरा पाकिस्तानच्या संसदेमध्ये इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. पाकिस्तानच्या संसदेतील तब्बल १७४ सदस्यांनी इम्रान खान यांच्याविरोधात मतदान केल्यामुळे अखेर इम्रान खान पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून पायउतार होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. अशा प्रकारे अविश्वास ठरावाद्वारे पदावरून हटवण्यात येणारे इम्रान खान पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मतदान

याआधी गेल्याच आठवड्यात इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. मात्र, पाकिस्तानच्या संसदेचे अध्यक्ष कासिम सूरी यांनी इम्रान खान यांच्याविरोधात विरोधकांनी मांडलेला अविश्वास ठराव फेटाळून लावला होता. मात्र, हे प्रकरण पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने कासिम सूरी यांचा निर्णय रद्दबातल ठरवत अविश्वास ठरावाची वाट मोकळी करून दिली. त्यानुसार, शनिवारी इम्रान खान यांच्याविरोधात संसदेमध्ये अविश्वास ठराव मांडण्यात आला. रात्री उशिरा या ठरावावर झालेल्या मतदानामध्ये १७४ संसद सदस्यांनी इम्रान खान यांच्याविरोधात ठरावाच्या बाजूने मतदान केलं. त्यामुळे इम्रान खान पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून पायउतार होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. 

शेहबाज शरीफ नवे पंतप्रधान?

दरम्यान, इम्रान खान यांच्या गच्छंतीनंतर पाकिस्तानी संसदेतील विरोधी पक्षनेते आणि पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज गटाचे अध्यक्ष शेहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान बनणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. रविवारी दुपारी २ वाजता पंतप्रधानपदी निवड करण्यासाठी मतदान होणार असल्याची देखील माहिती देण्यात आली आहे.

अविश्वास ठरावाआधी हाय व्होल्टेज ड्रामा

पाकिस्तानच्या संसदेमध्ये अविश्वास ठरावावर सकाळपासूनच काम सुरू करण्यात आलं. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा अविश्वास ठराव मांडण्यात आला. दुपारी १२च्या सुमारास सुरू झालेली मतदान प्रक्रिया मध्यरात्रीपर्यंत सुरू होती. पण ही प्रक्रिया सुरू होण्याआधीच संसदेचे अध्यक्ष असाद कासर आणि उपाध्यक्ष कासिम सूरी यांनी आपला राजीनामा संसदेसमोर सादर केला. त्यांच्यानंतर विरोधी पक्षातील नेते अयाज सादिक यांनी हंगामी अध्यक्षपद भूषवलं.

इम्रान खान स्वत: या ठरावाच्या मतदानावेळी गैरहजर होते. त्यांच्या पक्षाच्या खासदारांनी मतदानादरम्यान सभात्याग केला. त्यामुळे एकूण ३४२ सदस्यांच्या संसदेमध्ये १७४ मतांनी हा अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. अविश्वास ठराव मंजूर होण्याआधीच इम्रान खान यांनी संसदेतील पंतप्रधानांसाठी असलेली जागा सोडलेली होती.

नेमकं घडलं काय?

८ मार्च रोजी विरोधी पक्षनेते शेहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांच्याविरोधात पाकिस्तानच्या संसदेमध्ये अविश्वास ठराव मांडला होता. देशात निर्माण झालेली आर्थिक संकटाची परिस्थिती आणि बोकाळलेला भ्रष्टाचार या कारणांमुळे हा ठराव मांडण्यात आला होता. मात्र, इम्रान खान यांनी यावर विरोधकांची ही खेळी म्हणजे परकीय शक्तींचा कट असल्याची टीका केली.

अविश्वास ठरावावर ३ एप्रिल रोजी मतदान देखील घेण्यात येणार होतं. मात्र, त्याच दिवशी पाकिस्तानच्या संसदेचे उपाध्यक्ष कासिम सूरी यांनी हा ठरावच अवैध ठरवत फेटाळून लावला. यानंतर इम्रान खान यांनी पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी केली आणि राष्ट्रपती अल्वी यांना ३४२ सदस्यांची संसदच बरखास्त करण्याची तयारी सुरू केली. मात्र, त्याच दिवशी संध्याकाळी पाकिस्तानमधील संसदेनं उपाध्यक्षांचा निर्णय घटनाबाह्य ठरवत अविश्वास ठरावावर मतदान घेण्याची परवानगी दिली. त्यानुसार शनिवारी मतदान पार पडलं.

Post a Comment

0 Comments