काश्मीरच्या मशिदीत प्रक्षोभक घोषणा

काश्मीरच्या मशिदीत प्रक्षोभक घोषणा 

प्रार्थनेनंतर फुटीरतावाद्यांनी स्वातंत्र्याच्या घोषणा दिल्या,13 जणांना अटक

वेब टीम जम्मू : जम्मू-काश्मीरमधील जामिया मशिदीत नमाज अदा केल्यानंतर फुटीरतावाद्यांच्या एका गटाने स्वातंत्र्याचा नारा दिला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत घोषणाबाजी करणाऱ्या १३ आरोपींना अटक केली आहे.

शुक्रवारची नमाज संपल्यानंतर जामिया मशिदीत घोषणाबाजीचा २७ सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये जामिया मशिदीतील काही तरुण 'आम्हाला पाहिजे... आझादी' आणि नारा-ए-तकबीर... अल्लाह-हू-अकबर अशा घोषणा देत आहेत.

जम्मू-काश्मीर पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, शुक्रवारची नमाज अदा केल्यानंतर काही लोकांनी तेथे आझादीच्या घोषणा दिल्या. यावेळी धार्मिक घोषणाही देण्यात आल्या. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आम्ही एक टीम तयार केली आहे. व्हिडिओमध्ये 20-25 तरुणांनी आधी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली, त्यानंतर त्यांचा मशीद कमिटीसोबत वादही झाला. आम्ही अटक केलेल्या आरोपींविरुद्ध भादंवि कलम 124A आणि 447 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे..

२ वर्षांनंतर मशिदी सामान्यांसाठी खुल्या

जम्मू-काश्मीरमधील सर्वात प्रसिद्ध मशिदींपैकी एक असलेली जामिया मशीद नुकतीच सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली आहे. कोरोनामुळे मशीद २ वर्षांहून अधिक काळ बंद होती, मात्र रमजानच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला.

जामिया मशीद यापूर्वीही वादात सापडली आहे. 2018 मध्ये काही तरुणांनी या मशिदीवर दहशतवादी संघटना ISIS चा झेंडा फडकावला होता, ज्याचा तपास NIA कडे सोपवण्यात आला होता. या मशिदीचा पाया 1394 साली सुलतान सिकंदरने घातला होता.   

Post a Comment

0 Comments