रेल्वे रुळावरुन घसरल्याने ६१ जणांचा मृत्यू, ५२ जखमी
रुळावरुन घसरलेली रेल्वे ही १५ डब्यांची मालवाहू रेल्वे होती. यातील १२ डबे रिकामे होते
वेब टीम कांगो : आफ्रिकन देश कांगोमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला असून यामध्ये तब्बल ६१ लोकांचा मृत्यू झालाय. तर या भीषण अपघातात ५२ लोक जखमी झाले आहेत. रेल्वे रुळावरुन घसरल्यामुळे ही दुर्देवी घटना घडली असून जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या अपघाताबद्दल कांगो येथील राष्ट्रीय रेल्वेचे अधिकारी मार्क मन्योंगा नदांबो यांनी अधिक माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात आतापार्यंत ६१ जणांचा मृत्यू झाला असून अनेक महिला तसेच लहान मुले जखमी झाली आहेत. यामध्ये काहींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हा अपघात बुयॉफ्वे गावाजवळ घडला.
रुळावरुन घसरलेली ही रेल्वे १५ डब्यांची मालवाहू रेल्वे होती. यातील १२ डबे रिकामे होते. तर बाकीच्या तीन डब्यांमध्ये सामान ठेवलेले होते. रिकाम्या डब्यांमध्ये लोक अवैधरित्या प्रवास करत होते. अपघात झाल्यानंतर रेल्वेचे काही डब्बे थेट दरीत कोसळले. त्यामुळे कोसळलेल्या डब्यांतेदखील काही लोकांचे मृतदेह अडकले होते, असंदेखील रेल्वे अधिकारी नदांबो यांनी सांगितले.
दरम्यान कांगो या देशामध्ये पुरेशा प्रवासी रेल्वेगाड्या नसल्यामुळे येथील लोक लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी मालवाहू रेल्वेने प्रवास करतात. त्यासाठी जीव धोक्यात घालून अनेकवेळा रेल्वेमध्ये चढावं लागतं. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात याच भागातील केनझेन्झे शहरात रेल्वे रुळावरुन घसरली होती. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला होता.
0 Comments