तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा

तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा

वेब टीम मुंबई : मध्य महाराष्ट्र आणि भोवतालच्या प्रदेशात निर्माण झालेल्या चक्रिय वातस्थितीमुळे मंगळवारी राज्यभर ढगाळ वातावरण होते. तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत बुधवारी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर येथे  बुधवारी हलक्या सरी किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दोन्ही ठिकाणांसह सातारा आणि सांगली येथे गुरुवारी पावसाच्या हलक्या सरी किंवा मेघगर्जनेसह पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली येथे शुक्रवारीही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेले काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाच्या सरी कोसळत असल्याने मुंबईसह कोकणपट्टय़ातील भागांतही ढगाळ वातावरण आहे. 

मंगळवारी उन्हाने मुंबईकडे पाठ फिरवली होती. उपनगर आणि शहर भागात दिवसभर मळभ दाटले होते. परिणामी उष्णतेपासून मुंबईकरांना दिलासा मिळाला. किमान तापमानात मात्र दोन अंशांची वाढ झाली होती. दरम्यान अंदमानजवळ घोंघावणाऱ्या चक्रीवादळाचा कोणताही परिणाम महाराष्ट्रावर होणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.


Post a Comment

0 Comments