उकळतं तूप अंगावर ओतून महिलेची हत्या

उकळतं तूप अंगावर ओतून महिलेची हत्या 

पोलिसही चक्रावले,अद्याप अटक नाही

वेब टीम मुंबई : पतीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून गिता यादव (३६) या महिलेने उकळते तूप मनिषा पांडे (३०) यांच्या अंगावर ओतून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी लोकमान्यनगर भागात हा प्रकार घडला होता. ६ मार्चला मुंबईतील एका रुग्णालयात उपचारादरम्यान मनिषा यांचा मृत्यू झाल्याने सोमवारी त्यांच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमान्यनगर येथील पाडा क्रमांक चार भागात मनिषा या त्यांच्या तीन मुलांसोबत वास्तव्यास होत्या. तर ज्ञानेश्वरनगर भागात गिता ही तिच्या पतीसोबत राहते. मनिषा आणि गिताच्या पतीची तोंडओळख होती. परंतु पतीचे मनिषासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय गिताला होता. त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद होत असत. २३ जानेवारीला मनिषा या कामानिमित्ताने त्यांच्या माहेरी गेल्या होत्या. त्याचवेळी अचानक गिताने मनिषा यांना मोबाईलद्वारे संपर्क साधला. तसेच त्यांना जेवण बनवण्यासाठी घरी येत असल्याचे सांगितले.

मनिषा त्यांच्या लोकमान्य नगर येथील घरी पोहचल्या. घरामध्ये जेवण बनवत असताना गिताने उकळते तूप मनिषा यांच्या अंगावर ओतले. या घटनेत मनीषा यांचा चेहरा, छाती, मान, पोट, पाठी आणि मांड्यांना गंभीर इजा झाली. स्थानिक रहिवाशांनी त्यांना तात्काळ कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. ६ मार्चला उपचारादरम्यान मनीषा यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मनिषा यांच्या आईने मंगळवारी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिताला अद्याप अटक झालेली नाही. असे पोलिसांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments