प्रेमाला विरोध झाल्याने प्रेमी युगुलाची आत्महत्या
वेब टीम कामठी : प्रेमप्रकरणातून एका अल्पवयीन प्रेमीयुगुलाने शुक्रवारच्या रात्री कन्हान आणि कामठी दरम्यान असलेल्या रेल्वेरूळावर रेल्वेखाली आत्महत्या केली. या घटनेमुळे नवीन कामठी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाला असून तिची आई मोलमजुरीचे काम करते. तिला लहाण बहीण आणि भाऊ आहेत. तिचे प्रेमसंबंध होते. गेल्या आठवड्यात ही फोनवर तिच्या प्रियकरोसोबत बोलताना आढळल्याने आईने तिला रागावले होते. त्यांच्या प्रेमसंबंधाला तिच्या आईने विरोध केला होता. ८ मार्च रोजी तिची आई कामावर गेली असता सकाळी ११ ते दुपारी १ च्या सुमारास तिच्या प्रियकराने तिला दुचाकीवरून पळवून नेले.
दिवसभर मुलगी घरी न आल्याने तिच्या आईने इकडेतिकडे तिचा शोध सुरू केला. परंतु, कुठेही तिचा पत्ता लागला नाही. दरम्यान, वस्तीतच राहणारा तिचा प्रियकर असलेला मुलगा देखील बेपत्ता असल्याचे मुलीच्या आईला समजले. मुलीच्या आईने त्या मुलाच्या आईची भेट घेतली. त्यानंतर त्यांचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन दिवस झाले तरी दोघेही घरी न आल्याने शेवटी १० मार्च रोजी मुलीच्या आईने नवीन कामठी पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी मुलाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे लोकेशन घेतले असता तो कामठी परिसरातच असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलीस त्यांचा शोध घेत होते.
गुन्हा दाखल होताच आत्महत्येचा निर्णय :
मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलावर अपहरणाचा गुन्हा दाखल केल्याचे दोघांनाही समजले. पोलीस मुलाला अटक करतील. त्याला मारहाण करतील. त्याला कारागृहातही जावे लागेल, असे विचार त्यांच्या मनात आले. मनात भिती निर्माण झाल्याने दोघांनीही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारच्या रात्री नऊ वाजेच्या सुमारास दोघेही कन्हानकडून कामठीकडे येणाऱ्या रेल्वे मार्गावर आले.
रेल्वे चालकाने केला दोघांचाही जीव वाचविण्याचा प्रयत्न, मात्र….
अहमदाबाद एक्सप्रेस ही कामठीच्या दिशेने येत होती. गाडी जवळ येताच दोघेही रेल्वे रूळावर झोपले. चालकाच्या लक्षात हा प्रकार येताच चालकाने वारंवार हॉर्न वाजवत त्यांना बाजुला होण्याचा इशारा दिला. तसेच गाडीही थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, गाडी वेगात असल्याने दोघेही रेल्वेखाली चिरडल्या गेले. चालकानेच ही माहिती कामठी स्थानकाच्या उपस्थानक व्यवस्थापकाला दिली. कामठी पोलिसांना ही माहिती समजताच परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त मनिष कलवानिया, नवीन कामठीचे ठाणेदार संतोष वैरागडे, निरीक्षक कमलाकर गड्डीमे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी नोंद करून घेतली आहे.
0 Comments