खा.सुप्रिया सुळेंची भुईकोट किल्ल्याला भेट

खा.सुप्रिया सुळेंची भुईकोट किल्ल्याला भेट 

वेब टीम नगर : अहमदनगर शहराची स्थापना भूईकोट किल्ल्याच्या स्थापनेपासून झाली असे मानले जाते. याच किल्ल्यात कैदेत असताना भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया ग्रंथ लिहिला. या किल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली.

खासदार सुप्रिया सुळे एका खासगी कार्यक्रमानिमित्त अहमदनगर शहरात आल्या होत्या. कार्यक्रमाला अवधी असल्याने त्यांनी भूईकोट किल्ल्याला भेट देण्याची इच्छा आमदार संग्राम जगताप यांच्याकडे व्यक्त केली. त्यानुसार सुप्रिया सुळे यांनी आमदार संग्राम जगताप, शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर, राष्ट्रवादीचे अभिजित खोसे यांच्यासह भूईकोट किल्ल्याची पाहणी केली. 

या प्रसंगी आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपराव वळसे पाटील हे राज्यात अर्थमंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री असताना अहमदनगरच्या भूईकोट किल्ल्यासाठी 50 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र त्या निधीतील काहीच भाग आज तागायत मिळाला आहे.

ते पुढे म्हणाले की, या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. भारत छोडो आंदोलनात पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यासह राष्ट्रीय महत्त्वाचे नेते या किल्ल्यात कैदेत होते. या ऐतिहासिक वास्तूचा पर्यटन विकास होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी हा किल्ला संरक्षण विभागाकडून मिळवा. या किल्ल्यात 15 ऑगस्ट व 26 जानेवारी व्यतिरिक्त कधीही सर्वसामान्य नागरिकाला जाता येत नाही. हा किल्ला सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला व्हावा. यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्ली दरबारी प्रयत्न करावेत अशी मागणी केली. 

यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, किल्ला सुंदर आहे. या किल्ल्याच्या पर्यटन विकासाला परवानगी मिळत नसल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले. भारतीय सैनिक आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत याची प्रत्येक भारतीयाने जाणीव ठेवावी. संग्राम जगताप यांनी केंद्रीय संरक्षण मंत्र्यांना पत्र तयार करावे मीही संरक्षण मंत्र्यांना पत्र लिहिते. दोघेही जाऊन भारतीय संरक्षण दलाला विनंती करू की ठराविक दिवस ऑनलाईन बुकिंग अथवा इतर सुविधांतून सामान्य नागरिकांना किल्ल्यात परवानगी देण्याविषयी विनंती करू. आपल्या भविष्यातील पिढीला भारताचा इतिहास कळावा यासाठी आपण हे करू, असे सुप्रिया सुळे यांनी आश्वासन दिले. 

Post a Comment

0 Comments