मार्चमध्ये पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलचे भाव?

मार्चमध्ये पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलचे भाव? 

वेब टीम नवी दिल्ली : सौदी अरेबियाने  मार्च महिन्यासाठी आशियामध्ये विकल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाचे भाव वाढवले आहेत. कंपनीने सर्व कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये वाढ केली आहे. जगातील प्रमुख तेल निर्यातदारांपैकी एक असलेल्या सौदी अरेबियाने फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये आपल्या आशियाई ग्राहकांसाठी अरब लाइट कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ६० सेंटने वाढवली आहे.

रॉयटर्सने जानेवारी महिन्यात केलेल्या सर्व्हेमध्ये, कंपनी मार्चमध्ये आपला फ्लॅगशिप ग्रेड ६० सेंट्स प्रति बॅरलने वाढवू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. किमतीतील ही वाढ आशियातील मजबूत मागणी दर्शवते आणि यामुळे कंपन्या गॅसोइल आणि जेट इंधनात जास्त मार्जिन ठेवत आहेत.

सौदी अरेबियाच्या या निर्णयामुळे जर आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये चढ-उत्तर पाहायला मिळाला तर याचा थेट परिणाम भारतातील इंधनांच्या किमतीवर पडू शकतो. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो.

२ डिसेंबर २०२१ नंतर मुंबई-दिल्लीतील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झालेला पाहायला मिळाला नाही. पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या वेबसाइटवरील माहितीनुसार, दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर ९५.४१ रुपये तर डिझेलचा दर ८६.६७ रुपये प्रति लिटर इतका आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर १०९.९८ रुपये तर डिझेलचा दर ९४.१४ रुपये प्रति लिटर इतका आहे.

केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर सध्या स्थिर आहेत. मात्र, बिहार, राजस्थान आणि मध्यप्रदेश यांच्यासह देशातील इतर राज्यांमध्ये पेट्रोलची १०० रुपयांहून अधिक दाराने विक्री होत आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल सर्वात स्वस्त आहे. येथे एक लिटर पेट्रोलचा दर ८२.९६ रुपये आहे. एक लिटर डिझेल भरण्यासाठी ७७.१३ रुपये मोजावे लागतील.

Post a Comment

0 Comments