सोमय्यांकडे वेळच वेळ आहे जे काही करायचे ते त्यांनी खुशाल करावे : अक्षता नाईक

सोमय्यांकडे वेळच वेळ आहे जे काही करायचे ते त्यांनी खुशाल करावे : अक्षता नाईक 

वेब टीम मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी रायगडमधील कोर्लाई गावातल्या कथित १९ बंगल्यांविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कुटुंबीयांवर केलेल्या आरोपांची जोरदार चर्चा सुरू आहे. या जागेची खरेदी अन्वय नाईक यांच्याकडून रश्मी ठाकरे यांनी केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र त्यावर आता अन्वय सावंत यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीका देखील केली आहे.

अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक आणि त्यांच्या कन्या आज्ञा नाईक यांनी आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अक्षता नाईक यांनी आपली भूमिका मांडली.

“जे घडून गेलं ते घडून गेलं. मला वाटतं की आपण वर्तमान काळात जगायला हवं. किरीट सोमय्यांना जी काही माहिती हवी आहे, ती आरटीआय टाकून ते ऑनलाईन देखील घेऊ शकतात. ते जी काही केंद्राची सुरक्षा वापरत आहेत, त्यापेक्षा ऑफिसमधून त्यांनी एक फोन कॉल केला, तरी त्यांना सर्व काही गोष्टी मिळू शकतील. शक्तीप्रदर्शन करण्याची गरज नाही”, असं अक्षता नाईक यावेळी म्हणाल्या

“जे काही व्यवहार झाले आहेत, ते दोन सुशिक्षित लोकांनी मिळून केले आहेत. सगळं विचार करून केले आहेत. जुने खड्डे उकरून काढत बसलो, तर त्याला काही अर्थ राहणार नाही”, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, यावेळी बोलताना अक्षता नाईक यांनी किरीट सोमय्यांना खोचक सल्ला देखील दिला आहे. “किरीट सोमय्यांना फार वेळ आहे. त्यांना जे काही करायचंय, ते त्यांनी खुशाल करत राहावं. हवं तर माझ्या घरीही चहापाण्याला यावं. मी त्यांना सगळी माहिती द्यायला तयार आहे. हवं तर माझ्या बँक डिटेल्ससह सगळी माहिती द्यायला मी तयार आहे”, असं अक्षता नाईक यावेळी म्हणाल्या.


Post a Comment

0 Comments