माजी पंतप्रधानाचे मोदी सरकारवर हल्लाबोल
संयमी भाषेत पंतप्रधान मोदी, केंद्र सरकार आणि भाजपा यांच्यावर जोरदार प्रहार
वेब टीम नवी दिल्ली : प्रकृती अस्वास्थाच्या बातम्यानंतर आणि अनेक महिन्यानंतर मनमोहन सिंह यांनी समोर येत सध्याच्या घडामोडींवर भाष्य केलं आहे. पंजाब विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमिवर काँग्रेसने मनोमहन सिंह यांचा पंजाबी भाषेतला एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. साधारण ९ मिनीटांच्या या व्हिडिओत मनमोहन सिंह यांनी त्यांच्या संयमी भाषेत पंतप्रधान मोदी, केंद्र सरकार आणि भाजप यांच्यावर जोरदार प्रहार केले आहेत. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे देशाची आर्थिक, सामाजिक स्थिती, विदेश निती कशी बिघडली आहे यावर मनमोहन सिंह यांनी भाष्य केलं आहे. भाजपाचा राष्ट्रवाद हा इंग्रजांच्या फो़डा आणि राज्य करा या धोरणावर आधारीत आहे. या सरकारच्या काळात घटनात्मक संस्था दुर्बल केला जात असल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या अर्थिक धोरणांवर मनमोहन सिंह यांनी टीका केली आहे. “करोना काळात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आर्थिक घडी विस्कटली, बेरोजगारी वाढली आणि महागाईत वाढ झाली, यामुळे सर्वसामान्य जनता त्रासली आहे. गेली साडेसात वर्षे सरकार चालवल्यावर स्वतःच्या चुका कबुल करायला हे सरकार तयार नाहीये. उलट हे सरकार पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना दोष देत आहे. इतिहासावर दोष ढकलत स्वतःच्या चुका या काही कमी होऊ शकत नाहीत. पंतप्रधान म्हणून मी बोलण्यापेक्षा कामावर भर दिला. राजकारणातील फायद्यासाठी देश दुभंगेल असं काही केलं नाही,” असं मनमोहन सिंह म्हणाले.
मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान मोदी यांचे थेट नाव न घेता विदेश नितीवर कडाडून हल्ला चढवला आहे. राजकारणी लोकांची गळाभेट घेत संबंध सुधारले जाऊ शकत नाही, ना आमंत्रण नसतांना जात थेट बिर्याणी खायला गेल्याने असं होत नाही असं सांगत नवाझ शरिफ भेट आणि पाकिस्तानशी असलेले संबंध यांवर मनमोहन सिंह यांनी भाष्य केलं आहे. भाजपा सरकारकडे आर्थिक धोरणाबाबत कुठलीही समज नाहीये. हा मुद्दा फक्त देशाबद्द्ल मर्यादीत नसून केंद्र सरकारची विदेश निती पण अयशस्वी ठरली आहे. चीन आपल्या सीमेवर येऊन बसला आहे आणि हा मुद्दा दाबवण्याचा प्रकार सुरु आहे असा घणाघात सिंह यांनी केला.
दरम्यान काँग्रेसचे पंजाबमधील मुख्यमंत्री पदाचे उमेदवार चन्नी यांचे जोरदार समर्थन मनमोहन सिंह यांनी केले आहे. जनता काँग्रेसची चागंली कामे लक्षात ठेवते. पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेबाबत जी घटना घडली आहे त्यावरुन भाजपा पंजाबच्या जनतेचा अपमान करत असल्याची टीका सिंह यांनी केली आहे.
0 Comments