युक्रेन मधील भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारची प्रमुख पाच पावलं
वेब टीम नवीदिल्ली : रशिया-युक्रेन युद्धात सुमारे १६ हजार भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. युक्रेनमधील सर्व हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे, त्यामुळे सरकारला तेथील भारती नागरिकांना बाहेर काढणे कठीण झाले आहे. मात्र, त्यासाठी सरकारने नियोजन केले आहे. युक्रेनमध्ये मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी अडकले आहेत, हे सर्व विद्यार्थी भारत सरकारकडे मदतीची याचना करत आहेत. मूळची अमृतसरची असलेल्या एका विद्यार्थ्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अनेक भारतीय विद्यार्थ्यांनी तळघरात आश्रय घेतल्याचे दिसत आहे. हे सर्व विद्यार्थी त्यांच्या वसतिगृहाच्या तळघरात असून, ते खूप घाबरलेले दिसत आहेत. तर, युक्रेनमधील भारतीय नागरिकांना रस्ते मार्गाने तिथून बाहेर काढण्याची योजना भारत सरकारने आखली आहे.
१.युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी भारताने हंगेरी आणि पोलंडच्या सीमेवरून सरकारी पथके पाठवली आहेत. रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्यादरम्यान युक्रेनियन हवाई क्षेत्र बंद करण्यात आल्याने अधिकारी रस्तेमार्गाने प्रवास करत आहेत.
२.भारत सरकारने सुरक्षित मार्ग शोधून काढले आहेत, ज्याद्वारे युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याची योजना आखली गेली आहे. भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला म्हणाले की, ‘सुरक्षित मार्ग शोधण्यात आले आहेत. रस्ते मार्गाने, जर तुम्ही कीवहून निघालात तर तुम्ही पोलंडला नऊ तासांत आणि रोमानियाला सुमारे १२ तासांत पोहोचाल. रोड मॅप तयार करण्यात आलेला आहे.
३. युक्रेनमधील भारतीयांना मदत आणि माहिती देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने 24 X 7 नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.
४.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली आणि युक्रेनमधील भारतीय नागरिकांच्या विशेषतः विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली.
५.युक्रेन, हंगेरी आणि पोलंडमधील भारतीय दूतावासांनी युक्रेनच्या नागरिकांसाठी अनेक सूचना जारी केल्या आहेत. गरज पडल्यास बॉम्ब शेल्टर कसे शोधायचे याची माहितीही या सल्ल्यांमध्ये होती. दूतावासाने लोकांना सांगितले आहे की, जर ते राजधानी कीवला जात असतील तर त्यांनी तिथे जाऊ नये आणि ते राहत असलेल्या शहरांमध्ये परत जावे.
0 Comments