पुन्हा राणे पितापुत्र अडचणीत

पुन्हा राणे पितापुत्र अडचणीत 

वेब टीम मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशा सालियनच्या कुटुंबीयांनी राणे पिता-पुत्राविरोधा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती, असा दावा गेल्या आठवड्यात नारायण राणेंनी केला होता. याप्रकरणी कुटुंबीयांनी राणेंकडून दिशाची बदनामी होत असल्याचा आरोप केला होता. दरम्यान आज त्यांनी राणे पिता-पुत्रांविरोधात तक्रार दाखल केली असून मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दिशा सालियनवर बलत्कार करून तिची हत्या झाली आहे. ती गरोदरही होती, असा दावा नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यावर सालियन कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत आक्षेप घेतला होता. राणेंमुळे आपल्या मुलीची बदनामी होत आहे, त्यांनी तिची बदनामी करणं थांबवावं, असं आवाहन सालियन कुटुंबीयांनी केलं होतं. त्यानंतर आता सालियन कुटुंबीयांनी पोलिसांत राणे पिता-पुत्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मालवणी पोलिसांनी राज्य महिला आयोगाला अहवाल सोपवला आहे. दिवंगत दिशा सॅलियनची बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते. तिच्या शवविच्छेदन अहवालानुसार तिच्यावर बलात्कार झालेला नसून ती गरोदर सुद्धा नव्हती हे मालवणी पोलिसांनी राज्य महिला आयोगाला दिलेल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करून दिली आहे.

मृत्यूपश्चात देखील होत असलेल्या आपल्या मुलीच्या बदनामीमुळे व्यथित झालेल्या दिशा सॅलियनच्या आई वडिलांनी या संदर्भात दिशाच्या मृत्यूबाबत खोटी व बदनामीकारक माहिती देणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, आ.नितेश राणे व संबंधित सर्व व्यक्तींवर कारवाई करावी. तसेच दिशाबद्दल समाजमाध्यमावर नमूद असलेली चुकीची व बदनामीकारक माहिती काढून टाकण्यात यावी अशी तक्रार आई वसंती सॅलियन व वडील सतीश सॅलियन यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे केली आहे. त्यामुळे दिशाच्या मृत्यूबाबत कोणतेही पुरावे नसताना नारायण राणे यांनी तिच्याबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी दिशाच्या कुटुंबीयांनी केली आहे.



Post a Comment

0 Comments