शिवजयंती साजरी करण्याआधी ही नियमावली वाचा
वेब टीम नगर : राज्यात 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रजातीचे संक्रमण अद्याप सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन, गर्दी करून उत्सव साजरा न करता स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून काळजी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने 14 फेब्रुवारी ,2022 च्या शासन परिपत्रकान्वये मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. शिवजयंती साजरा करतांना घ्यावयाच्या मार्गदर्शन सूचनांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
कोविड-19 संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या 31 जानेवारी 2022 च्या परिपत्रकान्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
19 फेब्रुवारी,2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती (शिवजयंती) साजरी करीत असताना शिवज्योत वाहण्याकरता 200 भाविकांना व शिवजयंती उत्सवाकरिता 500 भाविकांना परवानगी देण्यात येत आहे.
अनेक शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेल्या शिवनेरी अथवा इतर गड/किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार 18 फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री 12 वाजता एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करतात परंतु, या वर्षी कोविड-19 प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.
दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु या वर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण करण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.
प्रभात रॅली, बाईक रॅली अथवा मिरवणुका काढण्यात येऊ नये. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे पालन करून छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करावी.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे (उदाहरणार्थ रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.
आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंग तसेच स्वच्छतेचे नियम मास्क, सॅनिटायझर वापर इत्यादी पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
कोविड-19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे.
या परिपत्रकानंतर प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्याचे देखील अनुपालन करावे. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी.असे आवाहन ही अपर जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी या परिपत्रकात केले आहे.
1 Comments
Shivjyantila miravanuk kadhu naye, social distance ashe sanganare rajakiya rally, sabha ya sarkhya prachanda gardichya karyakramala kashya sutaka deta ani media ne ha prashana vicharala ka nahi prashasanala?
ReplyDeletePrashasanache niyam kayde fakt samanya manasa ani samanyanchya utsavalach ka netya mandalichya sabha, karyakramala ka nahi?
Ashya du tondi vaganarya prashasanacha nishedh 🏴🏴