खूनप्रकरणी पोलिसाला जन्मठेप
वेब टीम नगर : पंढरपूरला आलेल्या दिंडीतील वारकऱ्याचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरवून नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने एका पोलिसाला जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. पोलिस नाईक दत्तात्रय भोसले (नेमणुक मंगळवेढा पोलिस स्टेशन, जि. सोलापूर ) असे आरोपी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
जिल्हा व सत्र न्यायाधीश शुक्ल यांनी त्याला शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अनिल घोडके यांनी काम पाहिले. हा खून जुलै २०१७ मध्ये झाला होता.
पोलिस नाईक दत्तात्रय भोसले हा पंढरपूर वारीच्या बंदोबस्ताच्या नेमणुकीला होता. त्यावेळी त्याची ओळख वारकरी नितीन यादव याच्याशी झाली होती. नितीन दिंडीमध्ये पंढरपूर वारीला गेला होता.
नितीन दिंडीतून परतत असताना भोसले याने त्याला बाहेर जेवायला जाण्याच्या बहाण्याने सोबत नेले. त्यामुळे इतर वारकरी परतले. पण नितीन परतला नव्हता. काही दिवसांनी कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक अनोळखी प्रेत आढळले.
ते नितीन यादव याचे असल्याची खात्री पटल्यानंतर याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला. हा खून पोलिस नाईक भोसले याने केल्याची बाब मोबाइलच्या तांत्रिक तपासानुसार स्पष्ट झाली.
त्यामुळे भोसले व त्याच्या एका साथीदाराला अटक झाली. पोलिस निरीक्षक वसंत भोये यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील अनिल घोडके यांनी या खटल्यात एकूण १५ साक्षीदार तपासले.
तपासी अधिकारी वसंत भोये, पोलिस आयुक्त सुनील पवार, मृताचा भाऊ प्रदीप, काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.
0 Comments