हैदराबादमधील धक्कादायक प्रकार ; १०१ बकऱ्यांचा दिला बळी
वेब टीम हैद्राबाद : लोकसभा खासदार आणि एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी रविवारी हैदराबादच्या बाग-ए-जहानारा येथे एका व्यावसायिकाने १०१ बकऱ्यांचा बळी दिला. बकऱ्यांच्या बळी देण्यासाठी कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. त्याआधी उत्तर प्रदेशातील हापूर येथून नवी दिल्लीस जात असताना वाहनावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार असादुद्दीन ओवेसी यांना केंद्र सरकारने दिलेली झेड दर्जाची सुरक्षा त्यांनी नाकारली होती.
३ फेब्रुवारीच्या हल्ल्यानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे प्रमुख ओवेसी यांचे समर्थक त्यांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत आहेत. या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने असदुद्दीन ओवेसी यांना झेड श्रेणीची सुरक्षा मंजूर केली होती. मात्र, त्यांनी ती फेटाळून लावली
ओवेसी यांच्यावरील हल्ल्यात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. या हल्ल्यानंतर दोन आरोपींना अटक करून तुरुंगात टाकण्यात आले असले, तरी यानंतरही या हल्ल्यात आणखी अनेक जण सहभागी असल्याची भीती व्यक्त होत आहे. हापूरमध्ये एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर झालेल्या गोळीबारात वापरण्यात आलेली शस्त्रे मेरठमधून आणण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली.
गाझियाबादमध्ये ओवेसी यांच्यावरील गोळीबाराचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. गुरुवारी दुपारी दोन अज्ञात तरुणांनी असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर गोळीबार केल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत होते. ओवेसी यांनी सर्वप्रथम ट्विट करून या घटनेची माहिती दिली. दिल्ली-लखनऊ एक्स्प्रेस वेच्या छिजारसी टोल प्लाझा येथे ही घटना घडली होती.
ही संपूर्ण घटना टोलनाक्यावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्याचा व्हिडिओही सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन हल्लेखोर दिसत होते. एकाने लाल हुडी घातली होती आणि एकाने पांढरा शर्ट आणि पॅन्ट घातली होती. ओवेसींच्या ताफ्याच्या वाहनाने धडक दिल्याने लाल रंगाचा हुडी घातलेला हल्लेखोरही जखमी झाला होता.
0 Comments