शिवसैनिकांच्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या जखमी

शिवसैनिकांच्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या जखमी 

वेब टीम पुणे : शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमनेसामने आलेले पाहायला मिळाले. शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुक्कीत भाजपा नेते किरीट सोमय्या अक्षरशः पायरीवर पडलेले पाहायला मिळाले. यानंतर पोलिसांनी प्रसंगावधान राखत किरीट सोमय्यांना जमावातून बाहेर काढत गाडीत बसवले.

किरीट सोमय्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर ते महापालिकेमध्ये आले असताना शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी सोमय्यांवर हल्ला केला. यावेळी पोलिसांनी किरीट सोमय्यांना घटनास्थळावरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसैनिकांच्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पायऱ्यांवर पडले. यानंतर पोलिसांनी सोमय्या यांना तिथून बाजूला नेत गाडीत बसवले.

पोलिसांनी किरीट सोमय्या यांना गाडीत बसवल्यानंतरही आक्रमक शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवरही हल्ला चढवला. काही कार्यकर्ते गाडीच्या समोर आले, तर काही कार्यकर्त्यांनी गाडीच्या मागच्या बाजूने हल्ला केला.

सोमय्या आधी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गेले. तिथे त्यांनी पुणे जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत तक्रार केली. तिथून पालिकेत आयुक्तांना भेटण्यासाठी ते आले असताना शिवसेना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली आणि सगळा प्रकार घडला.

दरम्यान, किरीट सोमय्या या हल्ल्यानंतर संचेती हॉस्पिटलला दाखल झालेत. या ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी होणार आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, “मुद्दे संपले की माणसं गुद्यावर येतात. पायाखालची वाळू घसरली की सभ्यतेचा बुरखा फाटून मूळ चेहरा समोर येतो. किरीट सोमय्या घाबरणाऱ्यांमधले नाहीत. त्यांचा प्रकरणे काढण्याचा इतिहास आहे. अनेकांना त्यांनी घरी पाठवलं आहे.

अख्ख्या महाराष्ट्राचं सरकार भाजपच्या कार्यकर्त्यांना गावोगावी त्रास देत आहे, असाही आरोप चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.

Post a Comment

0 Comments