“मी सरेंडर होण्यासाठी जातोय”
नितेश राणे कोर्टाच्या दिशेने रवाना
वेब टीम कणकवली : काल सेशन कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे, त्या निकालाचा आदर ठेवून मी आता सरेंडर होण्यासाठी जातोय. आतापर्यंत राज्य सरकारने वेगवेगळ्या बेकायदेशीर पद्धतीने मला अटक करण्याचा प्रयत्न केला. पण मी आज स्वत:हून, कोर्टाच्या निर्णयाचा आदर ठेवून मी स्वत: सरेंडर होण्यासाठी जात आहे. असं नितेश राणे यांनी माध्यमांना सांगितलं. यानंतर ते कोर्टाच्या दिशेने रवाना देखील झाले.
दरम्यान, कणकवली कोर्टाबाहेर मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. याचबरोबर, दंगल नियंत्रक पथक देखील झालं आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी हायकोर्टात केलेला जामीन अर्ज मागे घेतला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र नितेश राणे यांनी हायकोर्टातील अर्ज मागे घेतला असल्याची माहिती त्यांचे वकील सतीन मानेशिंदे यांनी दिली आहे.
नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या संरक्षणामध्ये पाच दिवस शिल्लक असतानाही तपास अधिकाऱ्यासमोर शरण जात असल्याचं सांगत हायकोर्टातील जामीन अर्ज मागे घेतला आहे. त्यांना तपासाला सामोरं जाण्याची इच्छा आहे”. हायकोर्टानेदेखील अर्ज मागे घेण्यास परवानगी दिली आहे.
0 Comments