भीषण अपघातात भाजपा नेत्याचा मृत्यू
धडकेनंतर ट्रॅक्टरचे अक्षरश: दोन तुकडे : भाजपा नेते आनंद गण्यारपवार यांचा घटनास्थळी मृत्यू
वेब टीम गडचिरोली : ट्रॅक्टरने कारला समोरासमोर दिलेल्या धडकेनंतर झालेल्या अपघातात चामोर्शी येथील भाजपाचे जिल्हा सचिव तथा ‘मन की बात’ कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक आनंद गण्यारपवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर, रासप नेते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य अतुल गण्यारपवार हे जखमी झाले आहेत. आरमोरी-ब्रम्हपुरी मार्गावरील रणमोचन फाट्याजवळ गुरूवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.
गुरूवारी सकाळी अतुल गण्यारपवार व आनंद गण्यारपवार हे चामोर्शी येथून ब्रम्हपुरीमार्गे चारचाकी वाहनाने नागपूरला जात होते. दरम्यान रणमोचन फाट्याजवळ समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने कारला जोरदार धडक दिली. यात कारमध्ये मागे बसलेले आनंद गण्यारपवार हे जागीच ठार झाले, तर अतुल गण्यारपवार व चालक हे एअरबॅगमुळे बचावले.
थोड्या वेळाने भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या वाहनाने तिघांनाही ब्रम्हपुरी येथे नेण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव कृपाल मेश्राम यांनी अतुल गण्यारपवार यांना ब्रम्हपुरी येथील सर्वोद्रय रुग्णालयात भरती केले. अतुल गण्यारपावार यांच्या मानेला दुखापत झाली असून, प्रकृती स्थिर आहे. दरम्यान खासदार अशोक नेते यांनी रूग्णालयात जात घटनेची माहिती घेतली. आनंद गण्यारपवार यांच्या निधनामुळे चामोर्शीमध्ये शोककळा पसरली आहे.
0 Comments