भारतात करोनामुळे ३१ लाख लोकांचे बळी

 भारतात करोनामुळे ३१ लाख लोकांचे बळी 

 सायन्स जर्नलच्या अभ्यासातून धक्कादायक आकडेवारी समोर

वेब टीम वॉशिंग्टन  : गुरुवारी सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार भारतात करोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची वास्तविक संख्या ही नोंदवलेल्या आकड्यांच्या सहा पट असू शकतो. भारतात आतापर्यंत ४ लाख ८३ हजार १७८ मृत्यूंची अधिकृत नोंद करण्यात आली आहे. पण सायन्स जर्नलच्या अभ्यासानुसार देशभरात अंदाजे किमान ३१ लाख लोकांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

गेल्या वर्षी एप्रिल ते जून दरम्यान करोनाच्या दुसऱ्या अंदाजे यापैकी ७१ टक्के म्हणजेच तब्बल २७ लाख मृत्यू झाले, असे संशोधकांना आढळले आहे. या  अभ्यासात असे म्हटले आहे की या कालावधीत, करोनामुळे मृत्यूदर दुप्पट झाला होता. अभ्यासात असे म्हटले आहे की जर आपण अधिकृत आकडेवारी पाहिली तर भारतात दर दहा लाख लोकांमागे ३४५ मृत्यू झाले आहेत, जे अमेरिकेतील करोना मृत्यू दराचा सातवा भाग आहे. भारतातील करोना संसर्गामुळे झालेल्या मृत्यूचे अपूर्ण प्रमाणीकरण आणि या मृत्यूंमागील इतर आजारांची कारणे दिल्याने, खरा आकडा समोर आलेला नाही. तसेच, सर्वाधिक मृत्यू हे ग्रामीण भागात झाले असून, त्यांची नोंद होऊ शकलेली नाही, असंही या अभ्यासात म्हटलंय.

अभ्यासासाठी, संशोधकांनी १० राज्यांमधील १.४ लाख लोकांचे फोनवरून सर्वेक्षण केले. तसेच, दोन लाख सरकारी आरोग्य केंद्र आणि नागरिक नोंदणी प्रणालींमधून झालेल्या मृत्यूंचा डेटा गोळा केला. या अभ्यासासाठी संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या विभागाचा डेटाही घेण्यात आला होता.

याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात?

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजीच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे प्रमुख डॉ. जयप्रकाश मुलीयल म्हणाले की, महामारी भारतात पोहोचेपर्यंत त्यांनी युरोपच्या दराच्या आधारे मृत्यूदराचा अंदाज लावला होता. ते म्हणाले, “माझ्या अंदाजानुसार, भारतात सुमारे २२ लाख मृत्यू झाले असते. मात्र केवळ हजारो मृत्यूंची नोंद होत आहे, ही लाजिरवाणी बाब आहे. माझ्या मते भारतात करोनामुळे किमान ३० लाख मृत्यू झाले आहेत.”

Post a Comment

0 Comments