नागपुरात ‘डान्स हंगामा’च्या नावाखाली अश्लील नृत्य

नागपुरात ‘डान्स हंगामा’ च्या नावाखाली अश्लील नृत्य

वेब टीम नागपूर : नागपूर जिल्ह्यातील उमरेड आणि कुही तालुक्यातील काही गावांमध्ये ‘डान्स हंगामा‘ नावाने जाहिराती करून बंद शामीयांनामध्ये अश्लील नृत्य सादर करत असल्याचा प्रकार उघडकीस आला. या कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल झाले असून त्यामध्ये काही तरूणी अश्लील नृत्य करत असल्याचे दिसत आहे.

सध्या नागपूर ग्रामीण भागात शंकरपटांचे आयोजन केले जात आहे, यामध्ये तरुण वर्ग उत्साहाने भाग घेतो. दिवसभर शंकरपटाचा आनंद घेतल्यानंतर तरुणांची लोंढा शामीयानांकडे वळू लागतो. या शामीयानामध्ये अश्लिलतेचा कळस गाठला जातो. नृत्य बघण्यासाठी रोज गर्दी वाढू लागली होती, मात्र पोलिसांना याबाबत माहिती नव्हती. व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून उमरेडमधील बामणी या गावात आणि कुही तालुक्यातील गावांमध्ये ‘डान्स हंगामा‘ नावाने कार्यक्रमाच्या जाहिराती लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे युवा वर्ग मोठ्या प्रमाणात गर्दी करीत होता.

पोलिसांचे दुर्लक्ष असल्यामुळे ग्रामीण भागात अश्लील नृत्याचा प्रकार सुरू आहे. अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत. पोलिसांनी सतर्क राहून अवैध धंदे बंद करण्याची मागणी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

उमरेडमध्ये गुन्हा दाखल

बामणी या गावात ‘डान्स हंगाम‘ कार्यक्रमासाठी पोलिसांनी कोणतीही परवानगी दिली नव्हती. अश्लील नृत्य केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत अशी माहिती उमरेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे यांनी दिली आहे.

विशेष तपास पथक स्थापन

ब्राम्हणी येथील अश्लील नृत्य कार्यक्रमाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. पोलीस उपाधीक्षक पूजा गायकवाड यांच्या नेतृत्वात स्वतंत्र चौकशी करण्यात येत आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. कुणाचीही हयगय करण्यात येणार नाही अशी माहिती नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments