समाजवादी पक्षाला धक्का; अपर्णा यादव भाजपमध्ये

समाजवादी पक्षाला धक्का; अपर्णा यादव भाजपमध्ये

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्या उपस्थितीत अपर्णा यांचा पक्षप्रवेश झाला.

वेब टीम लखनौ : गेल्या काही दिवसांपासून भाजपमधून बाहेर पडलेल्या नेत्यांना घाऊक पक्षप्रवेश देणाऱ्या समाजवादी पक्षाला बुधवारी धक्का बसला़  समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायम सिह यादव यांच्या स्नुषा अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्या उपस्थितीत अपर्णा यांचा पक्षप्रवेश झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल प्रशंसोद्गार काढतानाच, देशहित हा आपल्यासाठी कायम प्राधान्याचा विषय राहिलेला असल्याचे अपर्णा यादव म्हणाल्या़  स्वच्छता, महिला सक्षमीकरण आणि रोजगार यांसाठी भाजप सरकारने सुरू केलेल्या अनेक योजनांचे त्यांनी कौतुक केले.

अपर्णा या मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा प्रतीक याच्या पत्नी असून, सपचे अध्यक्ष अखिलेश यादव हे मुलायम यांच्या पहिल्या पत्नीचे पुत्र आहेत . अपर्णा यादव यांच्या भाजप प्रवेशाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती़  विधानसभा निवडणुकीपूर्वी अखिलेश हे पक्षाचा जनाधार वाढवण्याच्या प्रयत्नात असतानाच या घडामोडीमुळे ‘सप’ नेतृत्वाच्या कुटुंबातील फूट उघड झाली आहे. 

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अपर्णा यादव यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व इतर पदाधिकाऱ्याची भेट घेतली. राज्यातील मंत्र्यांसह भाजपच्या विशेषत: मागासवर्गीय घटकातील अनेक लोकप्रतिनिधींनी समाजवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर काही दिवसांतच ही घडामोड घडल्याने भाजपला काहीसा दिलासा मिळाला आहे.

अपर्णा यादव यांनी २०१७ साली लखनऊ कँट मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती, मत्र भाजपच्या रिटा बहुगुणा जोशी यांनी त्यांचा पराभव केला होता. जोशी या आता लोकसभेच्या खासदार आहेत.दरम्यान, अपर्णा यांनी भाजपमध्ये जाऊ नये यासाठी मुलायम सिह यादव यांनी त्यांचे मन वळवण्याचा बराच प्रयत्न केला होता, असे पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी बुधवारी सांगितले. भाजप प्रवेशाच्या निर्णयाबद्दल त्यांनी अपर्णा यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छाही दिल्या.

Post a Comment

0 Comments